कोल्हापूर : सोमवारपासून राज्यात संपूर्ण लाॅकडाऊनचा निर्णय झाल्यास दुकाने बंद राहतील. अन्यथा सोमवारी सकाळपासून राज्यातील सर्व दुकाने उघडण्यात येतील, असा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स अँड ॲग्रिकल्चरच्या शनिवारी रात्री झालेल्या बैठकीत अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी हा निर्णय जाहीर केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील सर्वच दुकाने बंद करण्यासाठी दिलेला कालावधी संपला आहे; परंतु पुन्हा त्यांनी दोन दिवसांचा कालावधी द्यावा, अशी मागणी केली आहे. राज्यात येत्या आठवड्यात संपूर्ण लाॅकडाऊन करण्याचा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे. मात्र, सोमवारी दुकाने उघडायची की नाहीत याबाबत व्हीसीमध्येही काहीच सुतोवाच केलेला नाही. त्यामुळे गुरुवार (दि.८) च्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सोमवारी दुकाने उघडली जातील. यासोबतच छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणीही चेंबरतर्फे करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्याला वेगळा नियम असावा, तेथील परिस्थितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून करण्यात आली. चंद्रपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूरने दुकाने सुरू करण्यावर भर दिला. गर्दी कमी करण्यासाठी कोविड लस घेतलेल्यांनाच दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. ज्या ग्राहकांनी लस घेतली आहे त्यांनाच दुकानात जाण्याची परवानगी द्यावी.
--------------
बुधवारनंतर लॉकडाऊन करा
येत्या सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. त्यानंतर लाॅकडाऊनचा विचार करावा. त्याला व्यापारीही सहकार्य करतील, अशी भूमिका राज्यातील चेंबरच्या पदाधिकाऱ्यांसह २०० मान्यवरांनी या ऑनलाइन व्हीसीमध्ये सहभाग घेतला.