कोल्हापूर : मोर्चात ज्या शिस्तीने व इर्षेने मराठा बांधव सहभागी झाले होते, त्याच किंबहुना त्यापेक्षा अधिक शिस्त व उत्साह मोर्चा विसर्जित झाल्यानंतर दिसली. दुपारी तीनपर्यंत सारं शहर मोकळे झाले. सुमारे ३५ लाख मोर्चेकऱ्यांचा कोल्हापूर शहरात वावर होऊनही मोर्चानंतर शहर अक्षरश: चकाचक दिसत होते, इतकी स्वयंशिस्तही येथे पाहावयास मिळाली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांसह सीमाभागातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले होते. दोन-अडीच वर्षांच्या मुलांपासून ७० वर्षांच्या वयोवृद्ध अगदी उत्साहाने मोर्चात सामील झाले होते. शहराच्या नऊ कोपऱ्यांतून नागरिकांचे अक्षरश: लोट शहरात आले. दसरा चौक, ताराराणी चौक, गांधी मैदान ओव्हरफुल्ल झालेच, पण त्याबरोबर शहरातील गल्लीबोळ भरून ओसंडून वाहत होते, अशी तोबा गर्दी मोर्चात होती. लाखोंचा जनसागर हाताळणे कोणाच्याही आवाक्याबाहेरचा विषय आहे, पण मराठा बांधवांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडविल्याने मोर्चा शांततेत झाला. सकाळी आठ वाजल्यापासून शहरात नागरिक येत होते, मोर्चा संपल्यानंतर ते एकदम बाहेर जाणार असल्याने गर्दी उसळण्याची शक्यता अधिक होती; पण दसरा चौकात मोर्चा विसर्जित झाल्यानंतर अगदी शिस्तबद्ध पद्धतीने नागरिक आलेल्या नऊ मार्गांनी घराकडे परतले. कोणत्याही प्रकारचा गोंगाट नाही, घोषणा नाही किंबहुना कोणत्याही प्रकारचा अतिउत्साहीपणा दिसला नाही. अगदी रांगेत वाहनतळापर्यंत पोहोचले, सकाळी घरातून निघताना जो जोश होता त्या जोशातच नागरिक घराकडे परतले. मोर्चा साधारणत: पाऊण वाजता विसर्जित झाला, त्यानंतर अवघ्या दोन तासांत शहर मोकळे झाले. (प्रतिनिधी) स्वयंशिस्तीचे दर्शन मोर्चा नव्हे आपल्या घरातीलच कार्य अशी भावना मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची होती. त्यामुळे मानापमान, एकमेकाला सांगासांगी कुठेही दिसली नाही. उलट एखाद्याची मोकळी पाण्याची बाटली रस्त्यावर पडली असली तरी ती तत्काळ उचलून कचरा कोंडाळ्यात टाकले जायचे. त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांनी व्हीनस कॉर्नर येथे कार्यकर्त्यांसमवेत मोकळ्या बाटल्या गोळा करून कोंडाळ्यात टाकत होते. रखरखत्या उन्हात उत्साह न्याराच मोर्चेकऱ्यांची सूर्यनारायणानेही काहीशी परीक्षा घेतल्यासारखेच केले. मागील दोन दिवस थंडीमुळे तापमान काहीसे कमी होते; पण शनिवारी सकाळी नऊपासूनच अंगाला चटके बसत होते. शनिवारी जास्तीत जास्त तापमान ३४ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. रखरखत्या उन्हातही मोर्चेकऱ्यांचा उत्साह काही न्याराच होता.
तीनपर्यंत सारं शहर मोकळे
By admin | Published: October 16, 2016 12:08 AM