नसिम सनदीकोल्हापूर : जिल्हा परिषद सदस्य असताना राजीनामा देऊन थेट विधानसभेच्या रिंगणात आतापर्यंत अनेकजण उतरले; पण पहिल्याच प्रयत्नात अवघ्या तिघांनाच यश मिळाले आहे. यात राजू शेट्टी, सत्यजित पाटील आणि अमल महाडिक यांचा समावेश होतो. प्रकाश आबिटकर यांना दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले.जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील नेते घडविणारी कार्यशाळाच आहे. आता राजकारणात स्थिरस्थावर असलेल्यांपैकी जवळपास ७0 टक्क्यांहून अधिक नेत्यांची सुरुवात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातूनच झालेली आहे. निवडणुका लागल्या की पारंपरिक राजकीय घराणी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यानंतर उमेदवारीसाठी प्राधान्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीवर हुकुमत गाजविणाऱ्या सदस्यांचाच विचार होतो; कारण सदस्य म्हणून ३0 ते ३५ हजार लोकसंख्येचा मतदारसंघ सांभाळण्याचे कसब आणि पदाधिकारी म्हणून जिल्हा पातळीवरील राजकारण हाताळण्याचा अनुभव हाताशी आलेला असतो.याच अनुभवाच्या जोरावर विद्यमान सदस्यांनीच थेट विधानसभेच्या रिंगणात बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारल्याची उदाहरणे आहेत. अमल महाडिक, राजू शेट्टी, सत्यजित पाटील ही नावे या यादीत अग्रक्रमाने येतात. जिल्हा परिषद सदस्य असतानाच राजू शेट्टी यांनी २00४ ची विधानसभा निवडणूक पहिल्यांदाच लढविली.
पहिल्याच प्रयत्नात त्यांनी बलाढ्य प्रतिस्पर्धी असलेले राजेंद्र पाटील यड्रावकर व रजनी मगदूम यांचा पराभव केला. २0१२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या अमल महाडिक यांनी २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना पराभवाचा धक्का दिला होता. जिल्हा परिषद सदस्य असलेले सत्यजित पाटील यांनी २00४ मध्ये कर्णसिंह गायकवाड यांना पराभूत करून आमदारकी पटकावली.तीन आजी, चार माजी सदस्य रिंगणातयावेळच्या विधानसभा निवडणुकीतही तीन विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रिंगणात आहेत. हातकणंगलेतून अशोकराव माने, शिरोळमधून अनिल यादव, राधानगरीतून जीवन पाटील यांनी सदस्यत्वाचा राजीनामा देऊन विधानसभेला जोर लावला आहे. माने व यादव हे भाजपचे, तर पाटील हे राष्ट्रवादीचे सदस्य होते. तिघांनीही आपल्या पक्षांना रामराम ठोकला आहे.
पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीची, तर माने व यादव यांनी जनसुराज्यची उमेदवारी घेतली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असलेले विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील यांच्यासह चंदगडमधून अप्पी पाटील, शिरोळमधून सावकर मादनाईक हे चौघेजण विधानसभेच्या रिंगणात पुन्हा एकदा आपली ताकद आजमावत आहेत.दुसऱ्या प्रयत्नात यशप्रकाश आबिटकर हे देखील जिल्हा परिषद सदस्य होते. २00९ मध्ये त्यांनी के. पी. पाटील यांच्याविरोधात अपक्ष म्हणून शड्डू ठोकला; पण त्यांना यश आले नाही. २0१४ मध्ये मात्र त्यांना यश मिळाले. संजय मंडलिक यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन २0१४ ची लोकसभा निवडणूक लढविली; पण त्यांना यश आले नाही. २0१९ मध्ये मात्र त्यांचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण झाले. हे पाच सदस्य अपवाद वगळता विधानसभेच्या आखाड्यात फारसे कुणाला यश मिळालेले नाही. रिंगणात मात्र बरेच सदस्य उतरतात; पण यश फारच थोड्यांच्या नशिबी येते.