प्र. क्र. २ (सर्वसाधारण महिला)
रमेश पाटील
कसबा बावडा : स्वत:चे मतदारसंघ आरक्षित झाले. परिणामी, महापालिकेत जाण्याची वाट बिकट झाल्याने कसबा बावड्यातील तीन विद्यमान नगरसेवकांनी कसबा बावडा पूर्व प्रभाग क्रमांक २ या प्रभागातून आपल्या कारभारणीला उतरविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे हे तीनही नगरसेवक सतेज पाटील यांचे समर्थक असल्याने उमेदवारी कोणाला द्यायची, असा पेचप्रसंगही त्यांच्यासमोर उभा ठाकण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासून सतेज पाटील गटाचे वर्चस्व राहिलेल्या कसबा बावडा पूर्व हा मागील २०१५ च्या निवडणुकीत सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होता. आता हा प्रभाग क्रमांक २ हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त आहे. या प्रभागातून प्राथमिक शिक्षण समिती सभापती व विद्यमान नगरसेवक श्रावण फडतारे यांनी पत्नी वृषाली फडतारे यांना या निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरे विद्यमान नगरसेवक अशोक जाधव यांनीही पत्नी गीता जाधव यांच्यासाठी या प्रभागातून प्रयत्न चालविला आहे. तिसरे स्वीकृत नगरसेवक मोहन सालपे हेसुद्धा पत्नी शीलाताई सालपे यांच्यासाठी आग्रही आहेत. या तिन्हीही नगरसेवकांचा निवडणुकीचे आरक्षण पडल्यापासून या भागात संपर्क वाढला आहे. याशिवाय या प्रभागातून सामाजिक कार्यकर्ते ॲड. नीलेश नरूटे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीची तयारी केली होती; परंतु प्रभाग सर्वसाधारण महिला गटांसाठी आरक्षित झाल्याने त्यानी पत्नी ॲड. पुष्पा नीलेश नरूटे यांना निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नरूटे हे व्यवसायाने वकील असल्याने त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. प्रगतशील शेतकरी पवन साळोखे यांच्या पत्नी पल्लवी साळोखे, बावडा व्यापारी पतसंस्थेचे संचालक शामराव करपे यांच्या पत्नी राजश्री करपे, जयश्री अतुल पाटील, पद्मा माने याही महानगरपालिकेत जाण्यासाठी इच्छुक आहेत. पाटील गटाकडून रिंगणात उतरणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान पाटील यांच्यासमोर असणार आहे. दरम्यान, अंजली सर्जेराव चौगले किंवा त्यांच्या जाऊबाई सुनीता चौगले याही ''अपक्ष'' म्हणून निवडणूक रिंगणात असणार आहेत. मागील निवडणुकीत या प्रभागातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी आपले उमेदवार उभे केले होते. यावेळी भाजप-ताराराणी आघाडीचाही उमेदवार रिंगणात असेल.
प्रभागातील सोडविलेले नागरी प्रश्न....
या प्रभागातील काही कॉलनीमध्ये, रस्ते गटारींची कामे झालेली आहेत. प्रभागांतील काही चौकांत हायमास्ट दिवे लावले आहेत. सध्याही काही कॉलनीतील रस्ते व गटारांची कामे सुरू असल्याचे या प्रभागात फेरफटका मारल्यावर दिसून आले. प्रकृती हॉस्पिटल रोड गेली २५ वर्षे प्रलंबित होता. मात्र, तो नुकताच करण्यात आला. अन्य इतरही रस्ते करण्यात आले आहेत. प्रभागात जिथे विद्युत खांब नव्हते त्या ठिकाणी नवीन विद्युत खांब बसवून विजेची सोय करण्यात आली आहे.
प्रभागातील रखडलेले नागरी प्रश्न.... प्रभागाचा बरासाच भाग शेतवडीत येतो. त्यामुळे शेतात प्लॉट पाडून अनेकांनी बंगले, घरे बांधली आहेत. ही घरे बांधताना सांडपाण्याच्या निर्गतीची काळजी घेतली नाही. घरे बांधून झाल्यावर ठोंबरे मळा, माळी मळा, बडबडे मळा, मर्दाने कॉलनी, बिरंजे पाणंद आधी कॉलनीमधील सांडपाण्याची निर्गत व्यवस्थित होत नसल्याचे दिसून आले. जागोजागी कॉलनीमध्ये पाणी तुंबून राहते. त्यामुळे दुर्गंधी सुटते. सध्या या प्रभागाच्या कॉलनीतील लोकांना सांडपाण्याच्या निर्गतीचा प्रश्न महापालिकेने लवकर सोडविण्याची अपेक्षा आहे.
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते: १) श्रावण फडतरे (काँग्रेस ) १८७१ ( विजयी )
२) रुपेश पाटील (स्वाभिमानी) ६३१ ३) रवींद्र माने (शिवसेना) २१९ ४) प्रशांत पाटील (राष्ट्रवादी) २०२ कोट : प्रभागात रस्ते, गटारी यांची कामे केली आहेत. संपूर्ण प्रभागांत एलईडी बल्ब बसविले आहेत. काही चौकांत हायमास्ट दिवे लावलेत. सध्या प्रभागांतील काही कॉलनीमध्ये गटारी आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या फंडातून काही ठिकाणी कामे सुरू आहेत. आतापर्यंत प्रभागात एकूण सव्वातीन कोटी रुपयांची मी कामे केली आहेत.
- श्रावण फडतारे
नगरसेवक, प्र. क्र. २
फोटो: २४ बावडा प्रभाग क्रमांक २
प्रभागातील रेडेकर पाणंद येथे सांडपाण्याची व्यवस्था केली नसल्याने रस्त्यावर असे पाणी तुंबलेले असते.