राज्य परिवहन महामार्ग महामंडळाच्या कोल्हापूर विभागात ११ आगार आहेत. या आगारात एकूण ७५० एसटी बसेस कार्यरत आहेत. गेल्या महिनाभरापासून संचारबंदी, तर रविवार (दि. १६) पासून आठ दिवसांचा कडक लाॅकडाऊन जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यामुळे एस.टी.महामंडळाची सर्वसामान्यांकरिता प्रवासी वाहतूक बंद झाली आहे. त्यात केवळ अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, खासगी आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता जिल्ह्यातील विविध मार्गावर दिवसभरात २० फेऱ्या होत आहेत. यात प्रामुख्याने गडहिंग्लज, गारगोटी, आजरा, चंदगड, इचलकरंजी, कुरुंदवाड, कागल, आदी गावांचा समावेश आहे. याशिवाय मालवाहतुकीसाठी काही प्रमाणात या बसेस वापरल्या जात आहेत. वाढत्या कोरोना संसर्गामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, याकरिता कोल्हापूर विभागाने १० बसेस जिल्ह्यातील विविध आगारात केवळ रुग्णवाहिका म्हणून कार्यरत ठेवल्या आहेत. त्याद्वारे रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्याचे काम सुरू आहे.
वाहक-चालकांना दिलासा
कोल्हापूर विभागातून मुंबईत बेस्ट प्रशासनाच्या मदतीकरिता प्रत्येक आठवड्याला ३० वाहक, चालक पाठविले जात होते. त्यातून कोरोनाबाधित होण्याचे वाहक, चालकांचे प्रमाण वाढले होते. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन रविवार (दि .१६) पासून मुंबईला चालक, वाहकांना पाठविण्यास बंद करण्यात आले आहे. तसे निर्देश महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना हा एकप्रकारे दिलासा मानला जात आहे.
कोट
लाॅकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील कार्य सुरू आहे. त्याकरिता ५० बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत, तर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन महामंडळाने १० बसेस विविध आगारात रुग्णवाहिका म्हणून कार्यरत ठेवल्या आहेत. त्याद्वारे रुग्ण सेवा सुरू आहे.
- शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी, एस.टी. कोल्हापूर विभाग.
फोटो : १७०५२०२१-कोल-एसटी
आेळी : कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकातील आगारात रविवारी बसेस अशा उभ्या करण्यात आल्या होत्या. (छाया : नसीर अत्तार)