विश्वास पाटील / कोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व दहाही मतदारसंघांत लक्षवेधी लढती होतील, असे आजचे चित्र आहे. त्यातील कागल, करवीर, शाहूवाडी, आदी मतदारसंघांतल्या लढती तर अधिक चुरशीच्या होतील, असे वातावरण आतापासूनच तयार झाले आहे. निवडणुकीची घोषणा झाल्याने राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी पक्की झाली असून, बहुधा जागावाटपही तसेच राहण्याची शक्यता जास्त आहे. राष्ट्रवादीने जागा वाढवून मागितल्या तरी त्यावर लढण्यासाठी त्यांच्याकडे तगडे उमेदवार नाहीत. कुरघोडीचे राजकारण म्हणून वाढीव जागा मागितल्या जात आहेत. महायुतीचे जागावाटप झाले नसले तरी कुणी किती जागा लढवायच्या, यावरून तणातणी होऊ शकते; परंतु तरीही लोकसभेप्रमाणे ‘महायुती’ही पाच घटक पक्षांसह विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार हे नक्की आहे. त्यामुळे या रिंगणातील दोन्ही प्रमुख आघाड्यांचे उमेदवार कोण असतील, हे देखील जवळपास निश्चित झाले आहे. जिल्ह्यातील दहा मतदारसंघांपैकी तब्बल सतरा उमेदवारांची उमेदवारीही नक्की असून, त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. आताचे विधानसभानिहाय चित्र पाहिले तर लढतीचा अंदाजही येऊ लागला आहे. दहापैकी करवीर, राधानगरी व शाहूवाडी मतदारसंघांत तिरंगी लढतीचे चित्र दिसते. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस व कोल्हापूर दक्षिणमध्ये महायुतीचा उमेदवारांचा शोध संपलेला नाही. प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्यांची कागदोपत्री संख्या जास्त होईल; परंतु लढती मात्र अपवाद वगळता दुरंगीच होतील.कोल्हापूर ‘दक्षिण’ मतदारसंघात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात सक्षम उमेदवार कोण? हाच प्रश्न आजही विरोधी पक्षासमोर आहे. भाजपकडून महेश जाधव, अमल महाडिक व उद्योजक चंद्रकांत जाधव यांची नावे चर्चेत आहेत. टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक श्रीनिवास साळोखे यांनीही येथून लढण्याची घोषणा केली आहे.आमदार के. पी. पाटील यांच्या विरोधात कोण, हा तिढा महायुतीला अजून सोडविता आलेला नाही. जेवढे जास्त उमेदवार तेवढी ‘के.पीं.’ची लढत सोपी होईल. शिवसेनेकडून प्रकाश आबिटकर व ‘स्वाभिमानी’कडून जालंदर पाटील यांच्यात उमेदवारीची बाजी कोण मारते व एकास उमेदवारी मिळाल्यास दुसरा काय करतो, हीच गोष्ट निर्णायक ठरेल.हातकणंगलेत माजी खासदार जयवंतराव आवळे यांनीच पुन्हा शड्डू ठोकला आहे. तिथे शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर विरुद्ध आवळे अशी लढत होईल. मिणचेकर यांचा तसा कुणाला राजकीय उपद्रव नसल्याने त्यांच्याबद्दल मतदारांत सहानुभूती आहे. ‘जनसुराज्य’चे माजी आमदार राजीव आवळे यांचा युवकांच्या गाठीभेटीद्वारे प्रचार सुरू आहे. डाव्या लोकशाही आघाडीकडून भाकपचे रघुनाथ कांबळे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर विरुद्ध काँग्रेसचे सत्यजित कदम अशी संभाव्य लढत होईल. मधुरिमाराजे यांना रिंगणात उतरण्याच्या हालचाली राष्ट्रवादीतर्फे आजही सुरू आहेत. सागर चव्हाण यांचे नावही कॉँग्रेसकडून पुढे करण्यात येत आहे. महायुतीत शिवसेना व ‘स्वाभिमानी’त या मतदारसंघासाठी रस्सीखेच आहे. महायुतीच्या उमेदवारावरच ‘जनसुराज्य’चे आमदार विनय कोरे यांना निवडणूक कशी जाणार, हे ठरणार आहे. सत्यजित पाटील यांची उमेदवारी शिवसेनेकडून नक्की झाल्यास भारतअप्पा पाटील काय करणार, याचाही निकालावर परिणाम होईल. काँग्रेसतर्फे कर्णसिंह गायकवाड नक्की आहेत. आमदार सा. रे. पाटील हेच अजूनही स्पर्धेत आहेत. त्यांचे वय सध्या ९३ वर्षे आहे. त्यांना उमेदवारी नसेल, तर मुलगा गणपतराव पाटील यांचे नाव चर्चेत होते. अनिल यादव किंवा ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील हे दोन पर्यायही काँग्रेसकडे आहेत. मतदारसंघ राष्ट्रवादीला गेल्यास राजेंद्र पाटील-यड्रावकर हे उमेदवार असतील. खासदार राजू शेट्टी हे उल्हास पाटील व सावकर मादनाईक यांच्यापैकी कुणाला संधी देतात, हे महत्त्वाचे आहे.आमदार चंद्रदीप नरके विरुद्ध पी. एन. पाटील या लढतीत ‘जनसुराज्य’-‘शेकाप’ आघाडीच्या राजू सूर्यवंशी यांच्या उमेदवारीने चांगलाच रंग भरला आहे. तिघाही उमेदवारांची तयारी पाहता लढत अटीतटीची होणार यात शंका नाही. संवेदनशील असलेल्या करवीरमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून डिजिटल फलक, आरोप-प्रत्यारोप यामुळे राजकारण तापले आहे. कुपेकर घराण्यातच उमेदवारीवरून तयार झालेला ‘दादा की ताई’ हा गुंता पक्षाने सोडविला आहे. तिथे आमदार संध्यादेवी कुपेकर यांचीच उमेदवारी नक्की झाल्याचे सांगण्यात येते. तसे झाल्यास संग्राम कुपेकर यांना आणखी पाच वर्षे विश्रांती घ्यावी लागेल. महायुतीतर्फे ‘स्वाभिमानी’चे राजेंद्र गड्ड्यान्नावर यांची उमेदवारी निश्चित आहे. स्वाती कोरी यांचेही नाव चर्चेत आहे.संवेदनशील व संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या कागल मतदारसंघात जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध संजय घाटगे अशी थेट लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात प्रचंड ुउलथापालथ झाली असून, मंडलिक व संजय घाटगे गटाने ‘भगवा’ हातात घेतला आहे. मंडलिक व घाटगे गट सध्या एकत्र आहेत. त्यामुळे अटीतटीची लढत होणार आहे. येथे विक्रमसिंह घाटगे गटाच्या भूमिकेस महत्त्व आहे.
आघाडी-महायुतीचे पैलवान सज्ज
By admin | Published: September 13, 2014 12:22 AM