मच्छिंद्र मगदूम
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगरूळ वार्ताहर : खाटांगळे (ता. करवीर) गावामध्ये सध्या ग्रामदैवत विठ्ठलाई देवी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून हे सर्व काम सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत लोकवर्गणीतून सुरू केले आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकीमुळे गटा-तटातील हेवेदावे वाढतात. त्यामुळे गावातील सामाजिक सलोखा बिघडू शकतो याचा परिणाम मंदिराच्या जीर्णोद्धार कामात होऊ नये व गावचा सामाजिक सलोखा राखण्यासाठी व गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय सर्व गटांतील लोकांनी एकत्र येत विठ्ठलाई देवीच्या साक्षीने गुलाल लावून केला. त्यामुळे तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींना व ग्रामस्थांना आदर्श वेगळा निर्माण झाला आहे. करवीर तालुक्यातील खाटांगळे ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सध्या अर्ज दाखल करण्याचे काम सुरू आहे. गावची लोकसंख्या सुमारे चार हजार असून एकूण मतदान १९०० इतके आहे. गावात एकुण तीन प्रभागात एकुण ९ सदस्य संख्या असून शिवसेना , काॅग्रेस,भाजप असे तीन गट आहेत. सध्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे. सध्या गावातील ग्रामदैवत विठ्ठलाई देवी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे हे सर्व काम गावकऱ्यांनी एकत्र येत लोकवर्गणीतून हाती घेतले आहे. गावातील सर्व लोकांनी एकत्र येत विठ्ठलाई मंदिरात मीटिंग घेऊन गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याला सर्वच नेत्यांनी पाठिंबा देत एका मीटिंगमध्ये सर्व जागांवर तोडगा काढत ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्धार केला. त्यामध्ये काँग्रेसप्रणित गटाला पाच जागा दोन वर्षे सरपंचपद तर शिवसेनाप्रणित गटाला चार जागा आणि तीन वर्षे सरपंचपद घेण्याचे ठरले आहे.
प्रतिक्रिया
प्रकाश मुगडे निवडणुकीमुळे गावातील सामाजिक सलोखा बिघडून गटातटांत वाद होतात. सध्या गावातील विठ्ठलाई देवी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे तसेच गावातील सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वानी एकत्र राहणे गरजेचे आहे. यासाठीच सर्वांनी एकत्र एक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्धार केला आहे.