- विश्वास पाटील कोल्हापूर : नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्ग कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली नको ती कल्पना आहे. त्यामुळे या मार्गाला काँग्रेसचा जाहीर विरोध असुन शक्तीपीठ मार्ग रद्द होण्यासाठी सर्वांनी संघटित ताकद उभी करण्याचा निर्धार येथे व्यक्त करण्यात आला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अजिंक्यतारा कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक झाली.
नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावातून जाणार आहे. या मार्गासाठी हजारो शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जाणार आहेत .त्यामुळे या शक्तीपीठ मार्गाला विरोध दर्शवण्यासाठी विविध गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार पाटील यांची भेट घेतली.
आमदार सतेज पाटील म्हणाले, कोणत्याही कार्याची कोल्हापुरातून झालेली सुरुवात ही राज्यभर पोहचत असते. त्यामुळें आणि नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधाची सुरवात कोल्हापुरातून करूया. या महामार्गाची माहिती अजुनही लोकांना नाही. खरोखरचं याची लोकांना गरज आहे काय? असा सवालही त्यांनी उपस्थीत करत, जमिनी घेवून रस्ता करणे हे संयुक्त ठरणार आहे काय? याचा देखील विचार करणे गरजेचे असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील 89 ते 94 टक्के शेतकरी दोन एकराच्या आतील आहेत. या महामार्गाच्या विरोधासाठी अकरा मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. गरज नसलेला हा महामार्ग असुन कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली ही नको ती कल्पना आहे. त्यामुळे काँग्रेसचा याला जाहीर विरोध राहील असेही त्यांनी जाहीर केले.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंबरीश घाटगे यांनी शेतकऱ्यांना न्याय आणि ताकद देण्याची शक्ती केवळ सतेज पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळें या लढ्याचे नेतृत्व आमदार पाटील यांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. शक्ति मार्ग मुळे जवळपास 400 एकर जमीन या महामार्गाखाली जाणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भूमीहिन होणार असल्याचही घाटगे यांनी सांगितले.. राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेचे अध्यक्ष एम पी..पाटील यांनी, शक्ती पीठ मार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. आता विरोधाशिवाय पर्याय नाही, जनरेट्याबरोबरच न्यायालय लढा देखील लढूया असे आवाहन केल.
बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी देवाधर्माच्या नावाखाली प्रत्येकाची गळचेपी करण्याचे काम सरकार करत आहे. त्यांना शेतकऱ्यांशी काही घेण देण नाही. त्यामुळे शक्तिपीठ मार्ग परतवून लावूया असे आवाहन केले.
यावेळी सुधीर पाटोळे, मल्हारी पाटील, दादासो पाटील यांच्यासह तेरा गावातील शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.