समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या दोन हजार शाळांमध्ये ‘समर कॅम्प’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सत्र संपल्यानंतर मे महिन्याची सुट्टी सुरू होण्याआधीच विद्यार्थ्यांना पुढील वर्षीची पुस्तके अभ्यासासाठी देण्यात येणार आहेत.उन्हाळी सुट्टीमध्ये अशा प्रकारचे समर कॅम्प शक्यतो कोल्हापूरमध्ये आणि नंतर तालुक्याच्या ठिकाणी घेतले जातात. खेळ, प्रशिक्षण, गडकिल्ले भ्रमंती, साहसी खेळ असे या कॅम्पचे स्वरूप असते; मात्र त्यासाठी फीदेखील आकारली जाते. याच धर्तीवर मात्र विनामोबदला जिल्हा परिषदेच्या दोन हजार शाळांमध्ये असे कॅम्प घेण्यात येणार आहेत.विविध बैठे आणि मैदानी खेळ घेणे, मूल्यवर्धन करणारे प्रशिक्षण देणे आणि संस्काराचे धडे देणे, असे या कॅम्पचे स्वरूप राहणार असून, २५ एप्रिल ते ४ मे या कालावधीत हे आयोजन केले जाणार आहे. एकदा परीक्षा झाल्या की शाळकरी मुलांना सुट्टी लागते. १ मेपर्यंत शाळेत केवळ शिक्षकच असतात. त्यापेक्षा या विद्यार्थ्यांना काही वेळासाठी अशा पद्धतीच्या अनौपचारिक शिक्षणामध्ये गुंतविण्याचा मानस व्यक्त केला आहे; मात्र कोणत्याही परिस्थितीत पाठ्यपुस्तकातील काहीही या दरम्यान शिकवू नये. मुलांना जे काही सांगितले जाईल ते आनंददायी असावे, अशा सूचना दिल्या आहेत.याच पद्धतीने सत्र संपल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची पुस्तके काढून पुढच्या वर्षीच्या इयत्तेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ती पुरविण्यात येणार आहेत. शाळा सुरू झाल्यावर नव्या इयत्तेची पुस्तके हातात पडण्यापेक्षा ती सुट्टीतच त्यांना मिळाली, तर किमान काहीतरी पूरक अभ्यास ते करू शकतील, अशी या उपक्रमामागील भूमिका आहे. सुट्टी संपल्यानंतर आधीच्या इयत्तेतील आणि नव्या इयत्तेतील वाचनावर आधारित अशी चाचणी परीक्षाही घेण्यात येणार आहे.सुट्टीतील अभ्यासही दिला जाणारपाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सुट्टीतील अभ्यासही दिला जाणार आहे. तो जिल्हा परिषदेकडून ठरवून दिला जाणार आहे. केवळ पुस्तकी अभ्यास न देता, त्यांना काही प्रात्यक्षिकेही दिली जाणार आहेत. जेणेकरून त्यांच्या अवांतर वाचनाला, अन्य कौशल्यांना चालना मिळेल.
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये ‘समर कॅम्प’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:40 AM