कोल्हापूर : कोल्हापूरचे पर्यावरण अधिक समृद्ध व्हावे, यासाठी हातकणंगले तालुक्यातील अल्लमप्रभू डोंगरावर 600 हून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले. विविध देशी झाडांचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
मदत फाउंडेशन, शिवराष्ट्र हायकर्स, सह्याद्री देवराई, अल्लमप्रभू योगपीठ, लिंगायत परीट महासंघ आयोजित या उपक्रमांतर्गत लावण्यात आलेल्या झाडांच्या संवर्धनाची संकल्प शपथ यावेळी घेण्यात आली. या उपक्रमात कोल्हापूर पीडियाट्रिक असोसिएशन, कोल्हापूर सीए असोसिएशन, कोल्हापूर केमिस्ट असोसिएशन, कंपनी सेक्रेटरी असोसिएशन, पन्हाळा नगरपालिका, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, गुरू गोरक्षनाथ गोशाळा सहभागी होत्या. माजी खा. राजू शेट्टी, मदत फाउंडेशनचे अध्यक्ष मदन पाटील, बसवकुमार स्वामी यांच्या हस्ते वृक्षारोपणाने उपक्रमास सुरुवात झाली.
अल्लमप्रभू डोंगरावर वड, पिंपळ, जांभूळ, करंज, आंबा, बहावा, सीताफळ, चेरी, पेरू, कदंब, जारुळ, बकूळ, गुंज, अर्जुन, सीता अशोक, रामफळ अशी 600 प्रकारची देशी झाडे लावण्यात आली.
यावेळी शिवराष्ट्र हायकर्सचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी वृक्षारोपण चळवळीची संकल्पना विशद केली. अल्लमप्रभू डोंगर वृक्षारोपण मोहीमप्रमुख महेशकुमार कोरे यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. यावेळी सीए नीलेश भालकर, डॉ. विजय गावडे, सौरभ शेट्टी, कंपनी सेक्रेटरी असोसिएशन अध्यक्ष अमित पाटील, अरविंद शेटे, राजेंद्र पोवार, अमित पोर्लेकर, मकरंद सूर्यवंशी, विक्रांत भागोजी, विनायक जरांडे यांच्यासह आळते ग्रामस्थांचा सहभाग होता.