कोल्हापूर : कोविड साहित्याची खरेदी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली असेल आणि त्यात जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील बांधकाम, सीपीआर, पाटबंधारे, महसूल यासह प्रमुख सरकारी यंत्रणेचा समावेश असेल तर एकट्या जिल्हा परिषदेचीच का म्हणून बदनामी, असा सवाल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केला आहे. चौकशी करा, दोषीवर निश्चित कारवाई करा, पण साप साप म्हणून भुई थोपटून जिल्हा परिषदेला बदनाम करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोविड साहित्याच्या ८८ कोटी रुपयांच्या खरेदीत झालेल्या घोटाळ्याच्या चर्चांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलेल्या भूमिकेच्या संदर्भात उपाध्यक्ष पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, किती रुपयांची खरेदी केली. कुणाकडून केली, टेंडर कसे भरले, किती रुपयांची बिले मंजूर केली. याबाबत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य यांना काहीही माहिती नाही. दोषीवर जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. जनतेचा पैसा हडप करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, पण यामुळे कोरोना काळात काम केलेल्या पदाधिकारी, सदस्य, आरोग्यसेवक, कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक, स्वयंसेवी संस्था यांच्या सेवेला गालबोट लागू नये एवढीच अपेक्षा आहे.
कोविड काळात जिल्हा परिषदेने महसूल, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, सीपीआर, महापालिका या यंत्रणेसोबत काम केले. एक आपत्ती समजून सर्व पदाधिकारी, अधिकारी अहाेरात्र राबले. कोणीही उपचारापासून वंचित राहू नये म्हणून सर्व यंत्रणेचा समन्वय साधत कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. चांगले काम केले म्हणून कौतुकही झाले, पण आता या खरेदीत अनियमितता असल्याचे, घोटाळा झाल्याचे सांगून केवळ एकट्या जिल्हा परिषदेला बदनाम केले जात आहे. या साहित्य खरेदीच्या समितीचे मुख्य नियंत्रण तत्कालीन सीईओकडे होते, सदस्य सचिव म्हणून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचीही भूमिका होती, असे उपाध्यक्ष पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी शिक्षण सभापती प्रवीण यादव, सदस्य विजय भोजे यांनीही अशा प्रकाराला जिल्हा परिषद थारा देत नाही, त्यामुळे नाहक बदनामी थांबवावी, असे आवाहन केले.