कोल्हापूर : ज्याबाबत २०१९ मध्ये तत्कालीन आमदार जयंत पाटील यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला चंद्रकांत पाटील यांनी मुद्देसूद उत्तरही दिले होते. या विषयात काहीच तथ्य नसतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चौकशा सुरू झाल्याने हादरलेल्या राष्ट्रवादीकडून पुन्हा आरोप सुरू झाले असल्याचा खुलासा पाटील यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील जमीनबाबत तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ४२ कोटींचा महसूल बुडवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. याला पाटील यांच्या कार्यालयाने सविस्तर उत्तर दिले आहे.
राधा स्वामी सत्संग बियास (आरएसएसबी) या धार्मिक संघटनेला पुणे जिल्ह्यात आपले केंद्र सुरू करायचे होते. या जागेच्या नजराण्यामध्ये नियमानुसार सूट देण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला त्यावरूनच त्यांच्यावर आरोप झाला आहे.
त्यामागे पुढील कारणे असल्याचा दावा करण्यात आला आहे. २४ जून २०२१ रोजी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सचिन वाझेच्या पत्रातील आरोपांनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी परिवहनमंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा असा झालेला ठराव, पाठोपाठ पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठविलेले पत्र, दुसऱ्याच दिवशी ईडीने अजित पवार यांच्या नातेवाइकांच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करणे, पाटील यांनी इतरही कारखान्यांच्या खरेदीची चौकशी करण्याचे पत्र लिहणे आणि दोनच दिवसांत अमित शहा सहकारमंत्री होणे, पवार यांच्या पुणे आणि सातारा जिल्हा बंकांना नोटिसा निघणे, यामुळे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व हादरले. त्यांना चंद्रकांत पाटील हे कर्दनकाळ वाटू लागले. म्हणूनच शिळ्या कढीला ऊत आणून काहीच तथ्य नसलेला आरोप करण्यात आला, असे पत्रकात म्हटले आहे.