कोल्हापूर : ज्यांच्या नेतृत्वावर त्यांच्याच लोकांचा विश्वास नाही. पूर्ण पॅनेल ज्यांना बनविता आले नाही. ज्यांना ‘चेंबर’च्या कामकाजाची नीट माहितीच नाही, अशा विरोधकांकडून आमच्यावर होणारे आरोप हे बालिशपणाचे आहेत. निव्वळ विरोध करण्याच्या भूमिकेतून परिवर्तन क्रांती पॅनेलच्या माध्यमातून विरोधकांनी सभासदांवर निवडणूक लादल्याचे व्यापार-उद्योग विकास आघाडीचे (जुने पॅनेल) प्रमुख व कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आनंद माने यांनी सोमवारी येथे सांगितले. बिनबुडाचे आरोप करून संस्थेची बदनामी करणाऱ्या विरोधकांना सभासदच योग्य उत्तर देतील. व्यापार-उद्योग क्षेत्रात चेंबर अविरतपणे कार्यरत असून, प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष कामावर, दूरगामी निर्णय मिळविण्याचे कार्य संस्थेने यशस्वीपणे केल्याचे त्यांनी सांगितले.‘चेंबर’च्या निवडणुकीबाबतची व्यापार-उद्योग विकास आघाडीची (जुने पॅनेल) भूमिका त्यांनी मांडली. अध्यक्ष माने म्हणाले, संस्थापक शिवाजीराव देसाई यांच्या विचारांनी संस्था अविरतपणे कार्यरत आहे. ‘चेंबर’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले. संस्थेचे कामकाज हे सभासदाभिमुख आहे. संस्था अविरतपणे कार्यरत असतानादेखील ती बंद अवस्थेत असल्याचा विरोधकांकडून होणारा आरोप बालिशपणाचा आहे. निवडणुकीत या विरोधकांना सभासदाच त्यांची योग्य जागा दाखवून देतील. सध्या अर्थकारण वेगाने बदलत असून, उद्योजकांची एकता महत्त्वाची आहे. तज्ज्ञ, स्थानिक प्रश्न सोडविण्यासह विकासासाठी राज्य, राष्ट्रीय पातळीवर प्रभावी संपर्क आवश्यक आहे. अशी जबाबदारी सक्षमपणे पेलू शकणारी, सामाजिक जाणीव असलेल्या व्यक्ती आमच्या पॅनेलमध्ये आहेत. मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमधील कोल्हापूरचा समावेश करणे, विमान सेवा व विमानतळ विकासासाठी सर्वसमावेशक प्रयत्न, आदी उद्दिष्टे घेऊन आम्ही सभासदांपर्यंत जात आहोत. आमची भूमिका लक्षात घेऊन निश्चितपणे सभासद आमच्या पाठीशी राहतील, असा आम्हाला विश्वास आहे.विरोधकांकडून ‘सनसनाटी’चा प्रयत्नस्वत:च्या खासगी व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी सामाजिक संस्थांचा गैरवापर करणारे विरोधक आमच्या कार्यपद्धतीवर टीका करीत आहेत. या विरोधकांना त्यांच्याच संस्थेतून विरोध झाला आहे. त्यामुळे आमच्यावर टीका करणाऱ्यांचे कर्तृत्व समजते, असे अध्यक्ष माने यांनी सांगितले. ते म्हणाले, संबंधित विरोधकांच्या विरोधातच आंदोलने झाली आहेत. विरोधकांकडून निव्वळ सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणे, तरुणांना संधी देण्यासाठी रिंगणातसंस्थेची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखण्यासाठी आम्ही या विरोधकांना हाक दिली होती. मात्र, त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नसल्याचे अध्यक्ष माने यांनी सांगितले. ते म्हणाले, विरोधकांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याने त्यांच्याकडील १२ जणांनी आमच्यावर विश्वास ठेवून माघार घेतली. विरोधक सांगतात, की तरुणांना संधी देण्यासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या पॅनेलमधील ८ पैकी ३ जणांनी वयाची ६० ओलांडली आहे. याउलट आमच्या पॅनेलमध्ये आम्ही पाच तरुण, नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
नेतृत्वावर विश्वास नसणाऱ्यांचे आरोप बालिशपणाचे
By admin | Published: January 03, 2017 12:54 AM