गडहिंग्लज : देशात राजकारण राहिलेलेच नाही. टोळभैरवांची भांडवलदारांच्या इशाऱ्यावर नाचणारी टोळीच शिल्लक राहिली आहे. त्यामुळे धर्मांधता आणि भांडवलशाहीची युतीच देश चालवत असल्याचा घणाघाती आरोप उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी केला.येथील नगरपरिषदेच्या प्रांगणात श्रमिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेतील अखेरचे तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष अकबर मुल्ला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.‘राजकारणातील बदलते प्रवाह’ याविषयावर बोलताना कोळसे-पाटील यांनी शब्दप्रामाण्यवाद्यांनी समाजातला बुद्धी प्रामाण्यवाद का आणि कसा संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे, याचा लेखाजोखा मांडला. मीडिया, न्यायव्यवस्था आणि प्रशासन या लोकशाहीच्या तिन्ही खाबांचे पाठबळ शब्दप्रामाण्यवाद्यांना मिळत आहे. त्या जोरावर हे समाजाच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या माणसाला मारत आहेत. मूठभर असले तरी भयानक आहेत; पण त्यांच्या हिंसेला अहिंसेने, शब्दाला बुद्धीने उत्तर देण्यासाठी आता समाजाने ‘डोळस’ होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.अॅड. दिग्विजय कुराडे यांनी स्वागत केले. कॉ. आय. सी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अकबर मुल्ला, सुभाष धुमे, आदींनी मनोगत व्यक्त केले. कॉ. उज्ज्वला दळवी यांनी आभार मानले. (वार्ताहर)पानसरेंना आताच का मारले ?२६/११ च्या हल्ल्याचे आणि शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूविषयी गूढ उकलण्याचे आणि वस्तुस्थिती समाजासमोर आणण्यासाठी कॉ. गोविंद पानसरे यांच्या पुढाकाराने कोल्हापुरात ३० डिसेंबरला केशवराव भोसले नाट्यगृहात सभा घेतली. राज्यभर सभा घेण्याचा त्यांनी केलेला निर्धार व त्याला मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद २६/११ च्या कटामागील धर्मांध शक्तींना मान्य नव्हता. त्यातूनच पानसरेंची हत्या झाल्याचा आरोप कोळसे-पाटील यांनी जाहीर सभेत केला.
धर्मांधता, भांडवलशाहीची देशात युती
By admin | Published: March 05, 2015 12:42 AM