गडहिंग्लज : गडहिंग्लज हे काँगे्रसची विचारधारा मानणारे शहर आहे. त्यामुळे पालिकेच्या सर्व जागा लढविण्याची तयारी काँगे्रसने सुरू केली आहे. मात्र, पक्षाला सन्मान व योग्य जागा मिळाल्यास समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची आपली तयारी आहे, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.गडहिंग्लज पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँगे्रसचे प्रांतिक सदस्य आणि गडहिंग्लज कारखान्याचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा अंजना रेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.पाटील म्हणाले, राज्यातील सर्व पालिकांच्या निवडणुका शक्य त्या ठिकाणी स्वबळावर आणि अन्य ठिकाणी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करून समविचारी पक्षांशी युती करून लढविण्याचा निर्णय नेतृत्वाने घेतला आहे. त्यानुसार गडहिंग्लजमध्येही काँगे्रसतर्फे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची यादी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.गतवेळी गडहिंग्लजमध्ये काँगे्रसने चार जागा लढविल्या होत्या. त्यापैकी दोन उमेदवारांचा अवघ्या ५०-१०० मतांनी पराभव झाला. मात्र, एकूण सुमारे ४५००-५००० मते पक्षाला मिळाली. त्यामुळे यावेळीही पक्षाचा विचार आणि काम तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहील. यासाठी जिल्हाभर मेळावे घेण्याचे नियोजन आहे, असेही सांगितले. तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील-गिजवणेकर, शहराध्यक्ष बसवराज आजरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, किसनराव कुराडे, राजशेखर यरटे, अॅड. बाळासाहेब पाटील, संजय बटकडली, विद्याधर गुरबे, प्रशांत देसाई उपस्थित होते. (प्रतिनिधी)नगराध्यक्षपदाचे उमेदवार गुलदस्त्यात!नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची इच्छा दोन-तीन कार्यकर्त्यांनी पक्षाकडे व्यक्त केली आहे, असेही आमदार पाटील यांनी सांगितले. त्यावर इच्छुकांच्या नावांची विचारणा पत्रकारांनी केली. मात्र, त्याबाबत मौन पाळून ‘ती’ नावे त्यांनी गुलदस्त्यातच ठेवली. राष्ट्रवादीशी ‘अॅग्रीमेंट’ नाही!जिल्ह्यातील काही संस्था आणि गडहिंग्लज साखर कारखान्यातील आघाडीप्रमाणे गडहिंग्लज पालिकेतही काँगे्रस राष्ट्रवादीबरोबर आघाडी करणार का? असे विचारले असता यासंदर्भात राष्ट्रवादीशी तसे कोणतेही ‘अॅग्रीमेंट’ झालेले नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.गती कासवाची... पण यश निश्चित!‘ससा’ आणि ‘कासवा’च्या शर्यतीप्रमाणे गडहिंग्लज तालुक्यात काँगे्रसनेदेखील कासवाचीच चाल आणि ध्येय ठेवले आहे. त्यामुळे अपेक्षित यश निश्चित मिळेल, असा दावा गडहिंग्लज कारखान्याचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी केला.गडहिंग्लजचे ‘राजकारण’ अस्थिर!काल भाजपात गेलेली मंडळी आज दुसऱ्याच विचारात आहेत. त्यामुळे गडहिंग्लजचे राजकारण अस्थिर झाल्याचे दिसत आहे. ते स्थिर झाल्यानंतरच काँगे्रसची भूमिकादेखील स्पष्ट होईल, अशी शेरेबाजीही आमदार पाटील यांनी केली.
गडहिंग्लज नगरपालिकेत समविचारींशी आघाडी
By admin | Published: October 21, 2016 1:12 AM