चंदगड : तिलारी (ता. चंदगड) येथील जलविद्युत प्रकल्पात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना प्रशासनाने तात्काळ जमिनी वाटप प्रक्रिया सुरू न केल्यास पाणी बंद व आमरण उपोषण शुक्रवार (२६)पासून मुख्य धरण तिलारी येथे करण्यात येणार असल्याचा इशारा तुडये, हाजगोळी, म्हाळुगे खालसा येथील प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन उपविभागीय अभियंता एम.के. संशिमठ यांना देण्यात आले आहे.
तिलारी जलविद्युत प्रकल्पांतर्गत विस्थापित गेली ३५ वर्षे पर्यायी जमिनीपासून वंचित आहेत. तुडये, हाजगोळी व म्हाळुगे खालसा येथील ४४८ खातेदारांची जमीन तिलारी प्रकल्पासाठी कवडीमोलाने संपादित झाली आहे. नोकऱ्या कर्नाटकातील लोकांना मिळाल्या. प्रकल्पदात्यांना तुडीये येथील सर्व्हे नं. ६७९ व ६९१ हाजगोळी येथील गट नं. १०२ व २०० व म्हाळुंगे खालसा येथील गट नं. ५८ व ५९ मधील जमिनी द्यायचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. या जमिनी मोजून देण्याबाबत पुनर्वसन विभागाने अधीक्षक भूमी अभिलेख, कोल्हापूर व उपअधीक्षक भूमी अभिलेख चंदगडच्या कर्मचाऱ्यांनी पाच वेळा आदेश दिला आहे.
तथापि, भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन सुटीच्या वेळी ठरवून आदेश दिले आहेत. भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी सुटीच्या दिवशी येण्याची नोटीस पाचही वेळा लागू करून एकदाही जमीन मोजणीसाठी ते आलेले नाहीत. त्यामुळे संतप्त तुडये, हाजगोळी, म्हाळुंगे खालसा येथील शेकडो प्रकल्पदात्यांनी खाचू पाटील व एम.बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंता तिलारी धरण विभाग तिलारीनगर यांना निवेदन दिले आहे.