भीमगोंडा देसाई-- कोल्हापूर--शासनाच्या शैक्षणिक फी सवलतीच्या (ईबीसी) विविध योजनांतील पैशांचे एकूण लाखो रुपयांचे धनादेश गेल्या सहा महिन्यांपासून येथील माध्यमिक शिक्षण विभागाच्या तिजोरीतच पडून आहेत. चिरीमिरीसाठी निधी वाटप केला नसल्याचा आरोप होत आहे. ‘लोकमत’मध्ये ‘माध्यमिक’मधील गैरकारभारासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर कारभाराची चौकशी झाल्यास आपले बिंग फुटेल, या भीतीपोटी मुदत संपलेले धनादेश वितरित केले जात असल्याचे शुक्रवारी उघड झाले. प्राथमिक शिक्षकांचे पाल्य, ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १५ हजारांपेक्षा जास्त नाही असे विद्यार्थी, माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलत, बारावीपर्यंत मुलींना शैक्षणिक सवलत, दहावीपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण या योजनांमधून प्रतिविद्यार्थी शासनाकडून कमीत कमी ६ रुपये ते ३००० रुपये दिले जातात. या सर्व योजनांचे शिष्यवृत्तीचे प्रस्ताव प्रत्येक वर्षी आॅक्टोबर महिन्यात शाळांकडून माध्यमिक विभागाकडे येतात. त्यानंतर शासनाकडून मार्चअखेर निधी ट्रेझरीत येतो. माध्यमिक विभागाचे प्रशासन पाठपुरावा करून स्टेट बँकेचे धनादेश शाळानिहाय काढले जातात. सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षाचेही ‘ईबीसी’ धनादेश जुलै २०१५ मध्ये माध्यमिक विभागाच्या कार्यालयात आले. मोठ्या शाळांचे ‘ईबीसी’ची ही रक्कम लाखांच्या घरात आहे. ही एकूण रक्कम अर्धा कोटींवर जाते. ज्या संस्था हजारांच्या घरात चिरीमिरी देतात, त्या संस्थाचे ‘ईबीसी’चे धनादेश दिले आहेत. दरम्यान, आठवड्यांपूर्वी माध्यमिकचे दोन कर्मचारी लाच घेताना सापडले. त्यानंतर ‘लोकमत’ने या विभागातील भ्रष्टाचाराची चिरफाड केली. सर्वसाधारण सभेतही सदस्यांनी पंचनामा केला. त्यामुळे सहा महिन्यांपासून तिजोरीत दाबून ठेवलेले धनादेश वितरणाचे काम गतीने सुरू झाले आहे. धनादेशाची मुदत तीन महिन्यांची असते. सहा महिने पडून असल्यामुळे त्यांची मुदत संपली आहे. आपल्या चुकीमुळे मुदत संपली आहे, म्हणून वाढवून नवीन धनादेश काढून वितरण करण्याचेही सौजन्य घेतलेले नाही. संबंधित संस्थेच्या प्रतिनिधींनी धनादेश हातात घेतल्यानंतर मुदत संपल्याचे निदर्शनास आले. सर्वसामान्य, गरीब विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून आलेल्या सवलतीच्या पैशांतील ‘चौथाई’ काढण्याची प्रवृत्ती यामुळे उघड झाली आहे...मग दिवसभर झुंबड का ?वारंवार शिक्षण संस्थांना कळवूनही त्या धनादेश घेऊन गेल्या नाहीत. परिणामी धनादेशांची मुदत संपली आहे, असे माध्यमिक प्रशासनाचे म्हणणे आहे. याउलट पैसे आम्हाला काय नको आहेत का?, दर महिन्याला पगारपत्रकाच्या निमित्ताने प्रत्येक संस्थेची व्यक्ती माध्यमिक विभागाशी प्रत्यक्ष संपर्कात असते, असे संस्थाचालकांचे मत आहे. धनादेश चिरीमिरी न घेता वितरित केल्यानंतर शुक्रवारी दिवसभर ते नेण्यासाठी झुंबड उडाली होती. यावरून धनादेश दाबून ठेवल्याचे स्पष्ट होते.संबंधित संस्थेस धनादेश घेऊन जाण्याचे वारंवार कळविले. तरीही ते घेऊन गेले नाहीत. त्यामुळे धनादेशांची मुदत संपली आहे. हे धनादेश नवीन काढून वितरित केले जात आहेत. - ज्योस्त्ना शिंदे, माध्यमिक शिक्षणाधिकारीसवलतीच्या शंभर रुपयांसाठी दोनशे खर्च..एक ा माजी सैनिकाच्या पाल्याला शैक्षणिक सवलतीच्या शिष्यवृत्तीची रक्कम म्हणून केवळ शंभर रुपयांचा धनादेश आहे. मुदत संपल्याने शंभर रुपयांच्या धनादेशासाठी फेरप्रक्रिया करून तो नवीन काढण्यासाठी दोनशे रुपये खर्च करावे लागणार आहेत. यामुळे स्वत:च्या खिशातील शंभर रुपये संबंधित विद्यार्थ्यास देतो, असे धनादेश घेतलेल्या संबंधित संस्थेच्या प्रतिनिधींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘इबीसी’च्या मुदत संपलेल्या धनादेशांचे वाटप
By admin | Published: January 23, 2016 12:32 AM