राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत विरोधकांनी चांगली मोट बांधण्याचा प्रयत्न केला असला तरी जागा वाटप ही त्यांची डोकेदुखी ठरणार आहे.
डझनभर नेते या गटात असल्याने त्यांच्यासह मागील निवडणूक लढवलेले व गेली पाच वर्षे सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठवण्यात आघाडीवर असलेल्यांना रोखायचे कसे? असा पेच पालकमंत्री सतेज पाटील यांच्या समोर राहणार आहे. त्यातून नाराजीचा सामनाही विरोधी गटाला करावा लागण्याची शक्यता आहे.
‘गोकुळ’ची निवडणुकीचे भवितव्य न्यायालयाच्या हाती असले तरी दोन्ही गटांकडून प्रचार सुरू झाला आहे. सत्तारूढ गटाकडे गेल्या तीस वर्षांपासून बारा-तेरा चेहरे कायम आहेत. गेल्या वेळेला सत्तारूढ गटाने जयश्री पाटील-चुयेकर, सदानंद हत्तरकी, उदय पाटील, वसंत खाडे, राजेश पाटील, विलास कांबळे हे चेहरे नवीन दिले. मात्र, चुयेकर यांचे पती, हत्तरकी व उदय पाटील यांचे वडील संचालक होते. त्यामुळे खाडे, कांबळे, राजेश पाटील या नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळेला तीन जागा वाढल्या आहेत. तरीही सत्तारूढ गटात तीन-चार चेहऱ्यांमध्येच बदल होण्याची शक्यता आहे. पारंपरिक चेहरे असल्याने त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या तशी मर्यादित आहे.
पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलीक यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पॅनल होणार हे निश्चित आहे. यामध्ये आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, विनय कोरे, प्रकाश आबीटकर, खासदार धैर्यशील माने, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, राजू शेट्टी, संपतराव पवार, संध्यादेवी कुपेकर आदी नेत्यांचा समावेश असू शकतो. त्यामुळे कोणाला किती जागा द्यायच्या आणि त्यातून राष्ट्रवादीला किती द्यायच्या आणि स्वत:कडे किती ठेवायच्या असा पेच पालकमंत्री पाटील यांच्या समोर राहणार आहे.
मागील निवडणुकीत पडत्या काळात बारा तालुक्यातून मंत्री पाटील यांना अनेकांनी साथ दिली. पाच वर्षांच्या संघर्षात सगळे एकसंधपणे राहिले, त्यामुळे यातून कोणाला डावलायचे? असा प्रश्नही येतो. त्यातच सत्तारूढ गटातून दोन-तीन संचालक येण्याची शक्यता असल्याने जागा वाटप करताना कसरत करावी लागणार आहे.
चौगुले, मोरे, देवकर, रेडेकर, किरणसिंहांना संधी शक्य
गेल्या पाच वर्षांत सत्तारूढ गटाला टोकाचा विरोध करण्याचे काम बाबासाहेब चौगुले, विजयसिंह मोरे, किरणसिंह पाटील, बाबासाहेब देवकर, अंजना रेडेकर, किशोर पाटील यांनी केले. या सहा जणांचा विचार मंत्री पाटील यांना करावा लागेल.
राष्ट्रवादीत वाटणी ठरलेली
राष्ट्रवादीतून आमदार राजेश पाटील यांना संधी मिळणार आहे. नविद मुश्रीफ व रणजीतसिंह पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. राधानगरीतून ए. वाय. पाटील हे कोणाला संधी देतात, हे महत्त्वाचे राहणार आहे. पाचवी जागा मिळाली तर मंत्री हसन मुश्रीफ करवीरचा विचार करू शकतात.
असे होऊ शकते जागा वाटप-
शिवसेना - ६ (संजय मंडलिक, प्रकाश आबीटकर, चंदद्रीप नरके आदी)
विनय काेरे - २ संपतराव पवार-१
राजू शेट्टी -१
राष्ट्रवादी-५
सतेज पाटील - ६