इचलकरंजी : शासनाच्या संजय गांधी निराधार व तत्सम योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष तपासणीचे काम पुढील आठवड्यापासून चालू होणार आहे. या सर्वेक्षणात बोगस लाभार्थी वगळून उर्वरित लाभार्थ्यांसाठी बायोमेट्रिक पद्धतीने प्रती महिन्याला अनुदान वितरित होणार आहे.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना अशा शासकीय योजनेंतर्गत लाभार्थ्याला प्रतिमाह सहाशे रुपये अनुदान मिळते. इचलकरंजी व परिसरात या योजनेसाठी दहा हजारांहून अधिक लाभार्थी आहेत. यापैकी काही लाभार्थी बोगस असल्याचा संशय आहे, असे बोगस लाभार्थी शोधण्यासाठी शासन हे सर्वेक्षण करीत आहे.सध्या लाभार्थ्यांच्या यादीची वॉर्डनिहाय छाननी केली जात असल्याची माहिती तलाठी अनंत दांडेकर यांनी दिली. वॉर्डनिहाय लाभार्थ्यांच्या रहिवासी पत्त्यांवर प्रत्यक्ष भेटी दिल्या जातील. घरोघरी जाऊन सांपत्तिक परिस्थितीचे सर्वेक्षण केले जाईल. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहने, इमारत, फर्निचर, आदींचा समावेश असेल. सर्वेक्षण युद्धपातळीवर करण्यासाठी शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील ८० ते ९० तलाठ्यांचा वापर केला जाईल. इचलकरंजी शहरासह कबनूर, शहापूर येथील लाभार्थ्यांचेही सर्वेक्षण होईल, असेही तलाठी दांडेकर म्हणाले. (प्रतिनिधी)‘बायोमेट्रिक’साठी आधार नोंद आवश्यकसंजय गांधी निराधार व तत्सम योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्याने बायोमेट्रिक पद्धतीसाठी आधार कार्डाची नोंद करणे अत्यावश्यक आहे. आधार कार्ड संबंधित बॅँक खात्याशी जोडले गेले आहे आणि बॅँक खाते लाभार्थ्याच्या हाताच्या ठशासी जोडलेले आहे. विशेष म्हणजे संबंधित बॅँकेचे अधिकारी प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या वॉर्डात जाऊन अनुदानाची रक्कम वितरित करणार आहेत.
लाभार्थ्यांना बायोमेट्रिक पद्धतीने अनुदान वाटप
By admin | Published: January 08, 2015 12:37 AM