कोल्हापूर : जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून अंत्योदय आणि प्राधान्य रेशन कार्डधारकाला मोफत तांदूळ देण्याच्या योजनेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत जिल्ह्यात सुमारे ६००० क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आले.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत रेशनवर एप्रिल ते जूनपर्यंत प्रतिलाभार्थी प्रती महिना पाच किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. या योजनेतील १२ हजार ४०० मेट्रिक टन तांदूळ जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश दुकानांमध्ये हा तांदूळ पोहोच झाला असून, काही दुकानांमध्ये तो दोन दिवसांत पोहोचणार आहे.
शुक्रवारी पहिल्याच दिवशी मोफत तांदूळ घेण्यासाठी लाभार्थ्यांची दुकानांसमोर गर्दी झाली. परंतु दुकानदारांनी कोरोना संसर्गाच्या खबरदारीसाठी सामाजिक अंतर ठेवून सर्वांना तांदूळ वाटप केले. प्रत्येक पात्र अंत्योदय आणि प्राधान्य रेशनकार्डधारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत धान्य देण्यात आले.