आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0७ : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या परस्थ भक्तांना क्षत्रिय मराठा चेंबर आॅफ कॉमर्सच्या पुढाकाराने शुक्रवारपासून फुटाणे आणि खडीसाखर प्रसाद म्हणून देण्यास सुरुवात झाली. यावेळी संस्थेच्या वतीने देवस्थान समितीस ७५ किलो फुटाणे व ७५ किलो खडीसाखर देण्यात आली.श्री अंबाबाईचा फुटाणे व खडीसाखर हा मूळ प्रसाद आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे लाडू प्रसाद दिला जातो. तोदेखील भाविकांना विकत घ्यावा लागतो. अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीने दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान हा लाडू प्रसाद बंद करून फुटाणे-खडीसाखरेचा प्रसाद भाविकांना मोफत देण्यात यावा, अशी मागणी केली होती. मात्र, देवस्थानला हा विषय बैठकीत मांडल्याशिवाय त्यावर निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे देवस्थान समितीने निर्णय घेण्याची वाट न पाहता क्षत्रिय मराठा चेंबर आॅफ कॉमर्सच्या वतीने उपाध्यक्ष जयेश कदम व आर. के. पाटील यांनी शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला ७५ किलो फुटाणे व ७५ किलो खडीसाखर दिली.यावेळी देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सदस्या संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव, प्रशांत गवळी उपस्थित होते. त्यानंतर समितीच्या वतीने लगेचच भक्तांना या प्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले. तसेच संघर्ष समितीच्या महिला सदस्यांनी सरस्वती मंदिराच्या बाहेर उभे राहून भाविकांना फुटाणे-खडीसाखरेचा प्रसाद दिला.यावेळी दिलीप देसाई, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, विजय जाधव, उमेश पोवार, नितीन सासने, सतीश कडूकर, विकास पाटील, पृथ्वीराज पाटील, विजयकुमार पाटील, प्रशांत पाटील, शिवा जाधव, संजय पाटील, बाबा आमते, विजय बहिरशेट, शाहू जाधव, विक्रांत पोवार, सचिन तोडकर, उमेश जाधव, उमेश पोवार, युवराज पाटील, दिलीप इंगळे यांच्यासह भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवस्थानचे फलक बदला
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या तसेच समितीच्या वतीने मंदिर व बा" परिसरात लावण्यात आलेल्या फलकांवर ‘महालक्ष्मी’ असा उल्लेख आहे. यावेळी संघर्ष समितीच्या सदस्यांनी व उपस्थित भक्तांनी, देवस्थान समितीने सर्व फलकांवरील नाव बदलून ‘अंबाबाई’ असे नाव करा अन्यथा समितीवरसुद्धा मोर्चा घेऊन येऊ, असा इशारा दिला.