कसबा बावडा : ताराबाई पार्क येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात सकाळी व सायंकाळी नागरिकांना फिरण्यास बांधकाम विभाग कार्यालयाने पूर्ववत परवानगी द्यावी, अशी मागणी इव्हिनिंग वॉक ग्रुपच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी ग्रुपचे सदस्य चार्टर्ड अकाैंटंट व माजी नगरसेवक शरद सामंत, प्रा. डॉ. राजेंद्र रायकर, प्रा. डॉ. बाबासाहेब उलपे, अजित फराक्टे तसेच सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक सुधाकर चव्हाण आदी उपस्थित होते.
लॉकडाऊनमुळे गेल्या नऊ महिन्यांपासून येथे नागरिकांना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा ताराबाई पार्कातील परिसर खूप मोठा आहे. अंतर्गत ६०० मीटरचा मोठा प्रशस्त रस्ता असल्याने या ठिकाणी सकाळी व सायंकाळी ताराबाई पार्क, नागाळा पार्क, कसबा बावडा, लाईन बाजार, न्यू पॅलेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने फिरावयास येतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ५:३० ते ८ अशी फिरण्याची वेळ निश्चित करून दिली आहे. नागरिकांची फिरण्याची वेळ व कार्यालयाची वेळ वेगवेगळी असल्याने या कार्यालयाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. मात्र गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे या परिसरात नागरिकांना पूर्णपणे फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तशी नोटीस गेटवर लावण्यात आली आहे. सध्या प्रशासनाने लोकांना मोकळ्या मैदानात, सार्वजनिक बागेत फिरण्यास परवानगी दिली आहे. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र ही बंदी अद्याप कायम तशीच ठेवली आहे. त्यामुळे ही बंदी उठवण्याची मागणी इव्हिनिंग वॉक ग्रुपने कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांच्याकडे केली. सोनवणे यांनी याबाबत वरिष्ठांची चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतो, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले, तर शिष्टमंडळाच्यावतीने मास्क, सोशल डिस्टन्स या नियमांचे आमच्याकडून काटेकोरपणे पालन केले जाईल, असे सांगितले. यावेळी सुनील मदाने, संदीप पाटील, अशोक पाटील, दिलीप गजगेश्वर, रमेश पाटील, विजय पाठक, महेश हमलाई, नरेश शिंगाडे, मोहन पिंगळे आदी उपस्थित होते.
फोटो ३०इव्हनिंग वॉक ग्रुप
सार्वजनिक बांधकाम परिसरात फिरण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून इव्हिनिंग वॉक ग्रुपच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चार्टर्ड अकाैंटंट शरद सामंत, प्रा डॉ. राजेंद्र रायकर, अजित फराकटे, प्रा. डॉ. बाबासाहेब उलपे, सुनील मर्दाने, रमेश पाटील, विजय पाठक, महेश हमलाई, नरेश शिंगणे, अशोक पाटील आदी उपस्थित होते.