कोल्हापूर : येणाऱ्या आठवड्यापासून सकाळच्या सत्रात कृषी दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत बुधवारी करण्यात आली. उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने ही सभा झाली.
यावेळी कृषी विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. गतवर्षीच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या १ कोटी ६४ लाखांपैकी १ कोटी १९ लाख रुपयांच्या अनुदानाचे साहित्य शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. अजूनही ४५ लाख रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले नसल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.
२३ मेनंतर लॉकडाऊनबाबत प्रशासनाने काहीही निर्णय घेतला तरी सकाळच्या सत्रात कृषीविषयक दुकाने उघडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसा ठरावही करण्यात आला. बी-बियाणे, कृषी औजारे, रासायनिक व जेैविक औषधे मिळण्यामध्ये शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. उपाध्यक्ष सतीश पाटील हे गडहिंग्लज पंचायत समितीमधून या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले होते, तर कल्पना चौगुले, मीनाक्षी पाटील, शंकर पाटील, गडहिंग्लजच्या सभापती रूपाली कांबळे या बैठकीत सहभागी झाल्या होत्या.
विक्रेत्यांनी रासायनिक जुन्या खतांचा पुरवठा जुन्या दरानेच करावा, असे आवाहन यावेळी उपाध्यक्ष पाटील यांनी केले. कृषी उपसंचालक भाग्यश्री पोवार, जिल्हा कृषी अधिकारी लतीफ शेख यावेळी उपस्थित होते.