इचलकरंजी : कोरोना संसर्गामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद आहेत. व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. राज्य शासनाने त्यांना कोरोना काळातील कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे इचलकरंजीतील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अशा मागणीचे निवेदन जनता दलाच्यावतीने प्रांत कार्यालयात देण्यात आले.
या निवेदनात, शहरातील छोटे दुकानदार अल्प भांडवलदार असल्याने त्यांना अनेक देणी देण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. गेल्या ७५ दिवसांपासून व्यवसाय बंद असल्याने दुकानदारांवरील कर्जाचा व व्याजाचा बोजा वाढत आहे. शाळा व महाविद्यालये ऑनलाईन सुरू असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी ४ यावेळेत दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, असे म्हटले आहे. या शिष्टमंडळात गौस अत्तार, जावेद मोमीन, पद्माकर तेलसिंगे, उषा कांबळे, आदींचा समावेश होता.