कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका, प्राधिकरण धरून वेगळे युनिट करून व्यापार सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी आम्हा सर्व व्यापारी, व्यावसायिकांची राज्य शासनाकडे मागणी आहे. त्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले असल्याचे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सोमवारी सांगितले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दि. ६ एप्रिलपासून कोल्हापुरातील अत्यावश्यक, जीवनावश्यक वगळता इतर सर्व व्यापार पूर्णत: बंद आहे. राज्य शासनाने दि. ४ जून रोजी पॉझिटिव्ह रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या निकषांवर नियमावली जाहीर केली. त्या निकषाप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिका आणि प्राधिकरणातील १८ गावे धरून या क्षेत्रफळाची लोकसंख्या जवळपास नऊ लाखांवर जाते. महापालिका क्षेत्रामध्ये ६.५ टक्क्यांच्या आत आहे. ऑक्सिजन बेडची उपलब्धतादेखील ४५ टक्क्यांच्यावर आहे. त्यामुळे कोल्हापूर प्राधिकरण धरून वेगळे युनिट करावे. त्यानुसार सरसकट सर्व व्यापार सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी संजय शेटे यांनी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासमवेत चर्चा झाल्यानंतर ‘कोल्हापूर चेंबर’च्या कार्यालयात व्यापारी, व्यावसायिकांची बैठक झाली. त्यामध्ये शासनाकडे या महानगरपालिका प्राधिकरण वेगळे युनिट करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी शिवाजीराव पोवार, संजय पाटील, ललित गांधी, प्रदीपभाई कापडिया, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, हरीभाई पटेल, प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, तौफीक मुल्लाणी, संपत पाटील, कुलदीप गायकवाड, अनिल धडाम, प्रकाश पुणेकर, अरुण सावंत, भरत ओसवाल, कमलाकर पोळ, प्रताप पोवार, अजित कोठारी, विनोद पटेल, वैभव सावर्डेकर, उदयसिंह निंबाळकर, अभयकुमार अथणे, सचिव जाधव, शांताराम सुर्वे, भानुदास डोईफोडे उपस्थित होते.
चौकट
यासाठी प्राधिकरणातील गावांचा समावेश
कोल्हापूर प्राधिकरणामध्ये शहरालगतच्या विविध १८ गावांचा समावेश आहे. या गावांमधील लोकसंख्या समाविष्ट केल्यास सर्व व्यापार सुरू करण्याच्या परवानगीसाठीच्या निकषांची पूर्तता होणार आहे. त्यामुळे महानगरपालिका आणि प्राधिकरण हे वेगळे युनिट करून परवानगीची आम्ही मागणी केली असल्याचे ‘कोल्हापूर चेंबर’चे सचिव धनंजय दुग्गे यांनी सांगितले.