लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोना काळात प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापा-यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. मात्र, इचलकरंजी शहराला डावलून केवळ कोल्हापूर शहरातील सर्व आस्थापना सुरू करण्याचा निर्णय म्हणजे शहरावर अन्याय आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्धारीत वेळेत सर्व आस्थापना सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी प्रांताधिकारी कार्यालयात व नगराध्यक्षांना दिले.
निवेदनात, चार महिन्यांपासून उद्योग व व्यवसाय बंद असले तरी कामगारांचा पगार, वीज बिल, दुकान भाडे, बॅँका, पतसंस्थांचे हप्ते हे थांबलेले नाहीत. व्यवसायच बंद असताना हे खर्च भागवायचे कसे, असा प्रश्न सर्वांसमोर आहे. असे असताना केवळ कोल्हापूर शहरात आस्थापना सुरू करण्याचा निर्णय घेवून इचलकरंजीवर अन्याय करण्यात आला आहे. वस्त्रोद्योगाचे केंद्र म्हणून या ठिकाणी कामगार वस्ती अधिक आहे. तरी सर्वच आस्थापना सुरू करण्यास परवानगी द्यावी, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात प्रकाश मोरे, सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, महावीर कुरूंदवाडे आदींचा समावेश होता.