कोल्हापूर : नाताळ, थर्टी फर्स्ट आणि नववर्षाचे स्वागत हे हॉटेल व्यवसायाच्या हंगामाचे दिवस आहेत. अशा स्थितीत हॉटेल रात्री सुरू ठेवण्याची वेळ एक तासाने वाढवून ती बारापर्यंत करण्यात यावी. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या हॉटेल व्यवसायाला राज्य शासनाने याबाबत सहकार्य करावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल मालक, व्यावसायिकांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे दि. १५ मार्चपासून जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट बंद झाली. तब्बल सात महिने ती बंद राहिली. त्यामुळे हॉटेल आणि टुरिझम इंडस्ट्रीला सुमारे ४५० कोटींचा फटका बसला. शासनाच्या कोरोनाबाबतच्या नियमावलींचे पालन करत टप्प्या-टप्प्याने ऑक्टोबरपासून ती पूर्ववत सुरू झाली.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने घराबाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने बऱ्यापैकी हॉटेल व्यवसायाने गती घेतली. या व्यवसायातील कामगारांना दिलासा मिळाला. मात्र, कोरोनाचा भविष्यातील संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार कोल्हापुरात मंगळवारपासून ते दि. ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या संचारबंदीची वेळ रात्री अकरा ते सकाळी सहा अशी आहे. त्यामुळे रात्री अकरानंतर सर्व व्यवहार बंद ठेवावे लागत आहेत. कोल्हापुरात नोकरी, व्यवसाय आटोपून रात्री नऊनंतर अधिकतर जेवण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये येतात. ही वेळ आणि हंगामाचे दिवस लक्षात घेऊन शासनाने सध्या हॉटेल, रेस्टॉरंट रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता काही प्रमाणात हॉटेल इंडस्ट्रीजने गती घेतली आहे. आता रात्री अकरापर्यंतच व्यवसाय करण्याच्या मर्यादेमुळे अडचण वाढली आहे. कोल्हापुरातील अनेकजण रात्री नऊनंतरच जेवण्यासाठी हॉटेलमध्ये येतात. त्याचा आणि व्यवसायाच्या सद्यास्थितीचा, त्यावर रोजगार अवलंबून असणाऱ्यांचा विचार करून शासनाने रात्री एक तासाने वेळ वाढवून द्यावी.-आनंद माने,माजी अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स
कोरोनाच्या नियमांचे पालन करून सध्या हॉटेल व्यवसाय सुरू आहे. संचारबंदीला आमचा विरोध नाही. मात्र, सध्या व्यवसायाच्या हंगामाचे दिवस असल्याने एक तासांनी वेळ वाढवून देण्याबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा.-उज्ज्वल नागेशकर, अध्यक्ष, कोल्हापूर हॉटेल मालक संघ
आकडेवारी दृष्टिक्षेपात
- शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटची संख्या : १५००
- जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंटची संख्या : सुमारे ३७००
- कामगारांची संख्या : सुमारे २५,०००