कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने मतदान केंद्रनिहाय लसीकरणाची मोहीम आखली आहे. ती प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात मतदान केंद्रनिहाय लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी देऊन आवश्यक प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी राज्याचे सार्वजिनक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
पहिल्या टप्प्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू केले आहे. त्यात केंद्र शासनाने १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाचे आदेश दिले आहेत.
केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोल्हापूर शहरात महापालिकेच्या विविध ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतून लसीकरण केले जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण प्रभावी ठरत असल्याने त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. मात्र, महानगरपालिका प्रशासनाकडे एक ते दीड हजारच लसींचा साठा उपलब्ध होत असल्याने, बहुतांश नागरिकांना लसीकरणाअभावी परतावे लागत आहे.
सध्याची परिस्थिती पाहता दि.१ मे पासून लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी लसीकरण केंद्रे वाढविणे आवश्यक आहे. याकरिता कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने व्यापक लसीकरण करण्यासाठी कोल्हापूर शहरात मतदान केंद्रनिहाय लसीकरण केंद्रे सुरू करण्यास परवानगीची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. अनुषंगाने कोल्हापूर शहरात मतदान केंद्रनिहाय लसीकरण केंद्रे सुरू करण्यास परवानगी देऊन आणि आवश्यक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी निवेदनात केली आहे.