जयसिंगपूर : सलून व्यवसाय बंद असल्याने आमची उपासमार होत आहे. दुकान भाडे, लाईट बिल यामुळे संकट निर्माण झाले आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिरोळ तालुका नाभिक सेवा संघटनेच्यावतीने शिरोळ तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे एक वर्षापासून सलून व्यवसायावर परिणाम झाला आहे. सध्या ही दुकाने बंद आहेत. इतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. हातगाडी, फेरीवाले, रिक्षा यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली आहे. पण हातावरचे पोट असलेल्या नाभिक समाजाला शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या सलून व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्याशिवाय पर्याय नाही.
यावेळी नायब तहसीलदार पी. जी. पाटील यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तुळसीदास माने, दत्तात्रय यादव, तानाजी गंगधर, तुळसीदास साळुंखे, प्रकाश गंगधर, भूपाल गंगधर, उदय गंगधर, दीपक पोवार, स्वप्निल बनकर, अमोल बनकर, मनोहर संकपाळ यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.