शिरोली : कोकण किनारपट्टीपासून कोल्हापूर, सांगलीपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे आंबोलीपासून महाबळेश्वरपर्यंत शंभर टीएमसी क्षमतेची धरणे बांधा, पश्चिम महाराष्ट्रातील पूरक्षेत्र नद्यांमधील वाळूउपसा करण्यासाठी हरित लवादाने परवानगी द्यावी, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
पूरग्रस्तांना भरीव मदत मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जलसमाधी यात्रा काढण्यात आली असून ही यात्रा गुरुवारी हालोंडी येथे आली. या वेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते माजी उपसरपंच अनिल पाटील यांच्या गुऱ्हाळ घरात आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी शेट्टी यांनी शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ प्रमाणेच नुकसानभरपाई तसेच नियमित शेतीकर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेली ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी केली. शिरोलीजवळील सांगली फाटा येथे महामार्गावर उड्डाणपूल उभा करा, शिरोळ तालुक्यात पुलांची उंची वाढवा, अशी मागणीही त्यांनी केली. या वेळी त्यांनी शिरोली, हालोंडी, नागाव येथील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे, करवीर उपाध्यक्ष विक्रम पाटील, हालोंडीचे उपसरपंच महावीर पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, दिलीप पाटील, सुनील पाटील, वर्धापन बेळंकी, शिरोलीचे उदय पाटील, सूर्यकांत खटाळे, राजू खटाळे उपस्थित होते.
फोटो ओळी :-
कोल्हापूर-सांगली मार्गावर हालोंडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आलेली संघर्ष यात्रा.