कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, गगनबावडा व शाहूवाडी हे तालुके अभयारण्याशेजारी असल्यामुळे वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू आहे. यामध्ये गवा रेडे, हत्ती, रानडुक्कर यांच्यासह अन्य वन्यप्राणी पीकांचे नुकसान करत आहेत.
गेल्या १0 वर्षांमध्ये या तालुक्यांतील ३५ हून अधिक नागरिकांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे गवे रेडे मारण्यास रीतसर परवानगी द्या अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.दिवसेंदिवस गवारेडयांचे हल्ले पाहाता नागरिकांना जीवन जगणे मुश्किल झाले असून अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. यामुळे शेकडो एकर जमिनी पडून आहे. शेतीस दिवसा वीज पुरवठा नसल्याने शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतीस पाणी पाजण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावे लागते. यावर उपाययोजना म्हणून महावितरण कंपनीने रात्री ऐवजी दिवसा वीज पुरवठा करावा अशीही आबिटकर यांनी वनमंत्र्यांकडे केली.यावेळी वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, गवा व वन्यहत्ती या वन्य प्राण्यांचा समावेश वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अनुसूची १ मध्ये अंतर्भुत असल्यामुळे गवारेडे व हत्तींना मारण्याची परवानगी तसेच गवा या वन्यप्राण्यांच्या प्रजनन क्षमतेवर (कुटुंब नियोजन) मर्यादा आणणे याबाबी निश्चित आहेत. परंतू आपल्या मतदार संघातील परिस्थिती लक्षात घेता याबाबत तात्काळ केंद्र शासनाकडे गवारेडे मारण्यासाठी परवानगी मिळावी याकरिता शिफारस करू.