कोल्हापूर : ब्रेक द चेन अंतर्गत सरसकट सर्व दुकाने बंद करण्याचा नियम अन्यायकारक आहे. तरीही पालकमंत्री व प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर व्यावसायिकांनी मंगळवारी दुपारनंतर दुकाने बंद ठेवली. मात्र, वरील नियमांबाबत नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच कोल्हापुरात रुग्णांची संख्या तुलनेने कमी असल्याने व्यावसायिकांना सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने बुधवारी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.
दुकाने बंदचा आदेश आल्यानंतर सोमवारी आम्ही पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. त्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगून एक दिवसाचा अवधी मागितला होता. मंगळवारी सकाळी सर्वांनी व्यवसाय सुरू ठेवला. मात्र, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दुपारी तीन वाजता दुकाने बंद करून आम्ही प्रशासनाला सहकार्य केले आहे. मात्र, या निर्णयाबाबत व्यापारी व नागरिकांमध्ये नाराजी आहे. तसेच कोल्हापुरातील रुग्ण संख्या नियंत्रणात आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था बळकटीसाठी सर्व आस्थापनांना सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी. व्यावसायिकांकडून सर्व नियमांचे पालन केले जाईल. असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, अजित कोठारी, प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, भरत ओसवाल, संपत पाटील, संभाजी पोवार, सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड आदी उपस्थित होते.
--
फोटो नं ०७०४२०२१-कोल- चेंबर ऑफ कॉमर्स निवेदन
ओळ : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
--
फाेटो कोलडेस्कला चेंबर ऑफ कॉमर्स निवेदन नावाने पाठवला आहे.