प्रशांत कोडणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनृसिंहवाडी : कर्नाटकातील अलमट्टी धरण ८८ टक्के भरले असून, पाणीपातळी ५१८ मीटरवर स्थिर ठेवण्यात आली आहे. धरणात १०८ टीएमसी पाणीसाठी असून, सध्या १,७३,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने राधानगरी धरण भरले असून, कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा, पंचगंगा, कृष्णा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पुराच्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व कर्नाटक प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय सुरू आहे.कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय यापूर्वीच झाला असून, कोल्हापूरपासून १४०,तर सांगलीपासून जवळपास १०० किलोमीटर अंतरावर असणाºया विजापूर आणि बागलकोट तालुक्याच्या सीमेवर अलमट्टी धरण आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील अनेक गावे पाण्याखाली गेली होती. त्याचवेळी अलमट्टी धरणाच्या उंचीचा मुद्दा वादग्रस्त बनला होता.२००५ सालीच धरणाचे बांधकाम पूर्ण झाले व याच वर्षापासून म्हणजे २००५ सालचा महापूर नंतर नृसिंहवाडी येथील पाणीपातळीत होणारी वाढ व पाणीपातळी कमी होणे यात मोठा फरक पडला असून, पावसाने उघडीप दिल्याशिवाय धरणातून होणारा विसर्ग जरी कमी असला तरी वाढलेली पाणीपातळी लवकर कमी होत नाही, असे चित्र पहावयास मिळत आहे. याचे कारण अलमट्टी धरण की हिप्परगी धरण हा संशोधनाचा विषय आहे.१३ जुलैला नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन १५ जुलैपासून नदीची पाणी पातळी स्थिर आहे. येथील श्री दत्त मंदिर पाण्याखाली असून, पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. तसेच धरणातून होणारा विसर्ग संयमित असूनदेखील येथील नदीचे पाणी ओसरत नाही. पंचगंगा नदीदेखील इशारा पातळीवर वाहत आहे. दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्याने पातळी घटलीआहे.जुलैच्या मध्यावरच राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अजून पावसाचे दोन महिने शिल्लक असून, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत आणखी दमदार पाऊस झाल्यास महापुरासारखा धोका निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक शासनाने योग्य समन्वय साधण्याची गरज आहे.अलमट्टी धरणात पाणीपातळी ५१८ मीटरवर स्थिर ठेवून यापेक्षा येणारे जादा पाणी विसर्ग केले जात आहे. २२ जुलै रोजी सकाळी पाणीसाठा १०८ टीएमसी असून धरण ८८ टक्के भरले होते. धरणात १,७३,९२३ क्युसेक्स पाणी जमा होत होते. तर तेवढेच पाणी विसर्ग होत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यातील धरणातील आवक व विसर्ग याची दररोज माहिती घेतली जात असून, अलमट्टी धरणाच्या पाणीपातळीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.- मंजुनाथ, अलमट्टी धरण अधिकारी
अलमट्टी ८८ टक्के; कोल्हापूर, सांगली जिल्ह्यास पुराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:51 AM