कोल्हापूर : राज्यात कोणत्याही क्षणी जाहीर होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात १६ हजार ५६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ईव्हीएम मशीनची प्राथमिक तपासणी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, साहित्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती अशी जिल्हा निवडणूक विभागाची प्राथमिक टप्प्यातील तयारी पूर्ण झाली आहे. आचारसंहिता जाहीर झाली की, पुढील प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली.शारदीय नवरात्रोत्सव संपल्याने आता सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. निवडणूक आयोगाकडून आज मंगळवारी कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाकडून सुरू असलेली प्राथमिक तयारीदेखील पूर्ण झाली आहे. जिल्ह्यासाठी आलेल्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मशीनची प्राथमिक तपासणी ऑगस्टअखेरीसच पूर्ण झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.निवडणूक जाहीर होताच ईव्हीएम मशीनची पहिले सरमिसळ, कर्मचाऱ्यांचेदेखील सरमिसळ होईल. त्यानंतर कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनचे प्रशिक्षण देण्यात येईल. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर मशीनचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल. त्यानंतर मशीन विधानसभानिहाय मतदारसंघांना पाठवले जातील. विधानसभानिहाय मतदारसंघांमध्येच ईव्हीएम मशीनमध्ये मतपत्रिका लावल्या जातील, मतदान झाल्यानंतर हे मशीन तेथील स्ट्राँग रूममध्ये ठेवले जातील. मतमाेजणीचे ठिकाण स्ट्राँगरूमजवळच असेल.
२० टक्के अतिरिक्त कर्मचारीलोकसंख्येच्या निकषानुसार यंदा जिल्ह्यात यंदा ९१ मतदान केंद्रे नव्याने जाहीर करण्यात आली आहेत. जिल्ह्यात ३ हजार ४५० मतदान केंद्रे असतील. त्यासाठी १३ हजार ८०० कर्मचारी लागणार आहेत. मात्र नेहमीच ठरलेल्या संख्येपेक्षा २० टक्के अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. त्यानुसार १६ हजार ५६० कर्मचाऱ्यांना निवडणुकीची ड्यूटी लावली जाणार आहे. शिवाय मतदान केंद्रांनुसार त्याप्रमाणात मशीनची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे.
यंदादेखील गृहमतदानाची सोयलोकसभेप्रमाणे विधानसभेलादेखील ८० वर्षांवरील ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांसाठी गृहमतदानाची सोय करण्यात आली आहे. तसेच सेवेवर नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान असेल.