काेल्हापूर : शिवसेनेची ‘गोकुळ’च्या निवडणुकीत तळ्यात मळ्यात भूमिका नाही, तर आमचे स्थानिक नेते महाविकास आघाडीसोबतच राहतील. जागा आणि उमेदवारीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच होईल, अशी माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिली.
‘गोकुळ’च्या राजकारणात काेल्हापुरातील शिवसेनेत दोन गट आहेत. खासदार संजय मंडलिक, प्रकाश आबीटकर हे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत आहेत. माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर हे सत्तारूढ गटासोबत आहेत. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार उल्हास पाटील, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, संग्राम कुपेकर आदींची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत अरुण दुधवडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शिवसेनेत कोणत्याही प्रकारची तळ्यात-मळ्यात भूमिका नाही. ‘गोकुळ’ निवडणुकीत इकडे तिकडे होणार नाही. शिवसेना महाविकास आघाडीसोबतच राहील. शिवसेनेला किती जागा घ्यायच्या, त्यातील उमेदवार निवडीचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच होईल. लवकरच याबाबत एकत्रितपणे रणनीती ठरवली जाईल.