‘शिरोळ’च्या जागेवरही काँग्रेसचा दावा, जागावाटपात कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत रस्सीखेच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 03:43 PM2024-10-17T15:43:29+5:302024-10-17T15:44:47+5:30
कोल्हापूर : विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, हातकणंगले अशा चार मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे आमदार प्रतिनिधित्व करत असून या ...
कोल्हापूर : विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, हातकणंगले अशा चार मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे आमदार प्रतिनिधित्व करत असून या चार जागांसह आता शिरोळच्या जागेसाठीही काँग्रेसने आग्रह धरला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. येत्या दोन दिवसांत काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता असून त्यात कोल्हापुरातील उमेदवारांचा समावेश असेल, असे सांगण्यात येते.
विधानसभा निवडणुकीची मंगळवारी घोषणा झाली आणि राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवारांच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. कोल्हापुरातील जागांबाबत मुंबईत प्रदेश काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून चर्चा चर्चा, वाटाघाटी सुरू असून लवकरच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. विधानपरिषदेतील गट नेते आमदार सतेज पाटील प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करत आहे.
विद्यमान आमदारांपैकी करवीरमधून पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील, कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील, हातकणंगलेमधून आमदार राजू आवळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. कोल्हापूर उत्तरमधून आमदार जयश्री जाधव यांच्या उमेदवारीवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यांच्याऐवजी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या पर्यायी उमेदवारीचीही चाचपणी सुरू आहे. परंतु अद्याप तरी असा उमेदवार काँग्रेस समोर नाही.
जिल्ह्यातील चार जागा या काँग्रेसला मिळणार हे जरी निश्चित असले तरी शिरोळच्या पाचव्या जागेवरही दावा करण्यात आला आहे. या जागेबाबत एक दोन दिवसांत निर्णय होणे अपेक्षित आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार निवडणूक आणण्याची जबाबदारी आमदार सतेज पाटील व खासदार शाहू छत्रपती यांच्यावर राहणार आहे.