कोल्हापूर : दीर्घ आजारास कंटाळून वृद्ध दाम्पत्याने एकमेकांचे हात धरून रंकाळा तलावात उडी टाकून आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली. विजयमाला पाटील (वय ७५) व धोंडिराम बळवंत पाटील (८० दोघेही रा. जाधववाडी. मूळ धोंडिराम पाटील विजयमाला पाटील रा. महाडिक वसाहत, कोल्हापूर) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जुन्या काळातील न्यू आनंद सायकल कंपनीचे मालक धोंडिराम पाटील व त्यांच्या पत्नी विजयमाला हे महाडिक कॉलनीत मुलांसह राहत होते; पण आर्थिक परिस्थिती बिघडल्याने त्यांनी काही वर्षांपूर्वी महाडिक वसाहतमधील घर विकले. त्यानंतर ते मुलांसह पाटोळेवाडीत राहिले. वृद्धापकाळात दोघांनाही दीर्घ आजार जडल्याने ते वैतागले होते. विजयमाला यांना फिटचा त्रास होता.
शनिवारी सायंकाळी सायंकाळी दोघेही रंकाळा येथे फिरण्यासाठी गेले. त्याच रात्री तलावात उडी मारून आत्महत्या केली. रविवारी रात्री विजयमाला यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना सापडला; पण ओळख न पटल्याने तो बेवारस म्हणून सीपीआर रुग्णालयात ठेवला होता. दरम्यान, सोमवारी सायंकाळी धोंडिराम पाटील यांचाही मृतदेह त्याच ठिकाणी पाण्यावर तरंगताना आढळला.
जुना राजवाडा पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून सीपीआरमध्ये आणला. त्यांच्या पँटच्या खिशात दोन ओळखपत्रे सापडली. त्यात विजयमाला पाटील यांचाही फोटो व नाव होते. पोलिसांनी नातेवाईकांना बोलावून घेतल्यानंतर दोघांचीही ओळख पटली. सीपीआरमध्ये आई-वडिलांचा मृतदेह पाहून मुलांनी हंबरडाफोडला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. आजाराला कंटाळून वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
अखेरचा प्रवास सोबतच...मुले मोठी झाल्याने त्यांना आपला त्रास नको म्हणून त्यांना पाटोळेवाडीत ठेवून धोंडिराम व विजयमाला हे दाम्पत्य मुलीच्या लग्नानंतर जाधववाडीत भाड्याची खोली घेऊन स्वतंत्रपणे राहिले. त्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री हाहात हात घट्ट पकडून रंकाळा तलावात आत्महत्या करून अखेरचा प्रवास सोबतच केला.