इचलकरंजी : मराठी भाषा दिवसानिमित्त येथे 'आलोर गान' हे नाटक पार पडले. आशयपूर्ण संवाद, उत्कृष्ट देहबोली, सुरेल संगीत व लोककलेचा योग्य वापर, कथेला शोभणारी वेशभूषा आणि दिग्दर्शन यामुळे या प्रयोगास रसिकांची दाद मिळाली. तसेच 'भुताचा जन्म' या मिश्किल कथेवरील लक्षेवधी एकपात्री प्रयोग संकेत सीमा विश्वासराव या कलाकाराने सादर केला.
येथील मराठी नाट्य परिषद शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, रोटरी क्लब सेंट्रल आणि मनोरंजन मंडळ युवक विभागाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. टायनी टेल्सनिर्मित भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र व सर्जनशाळा कोल्हापूर प्रस्तूत 'आलोर गान' हे नाटक कलाकारांनी सादर केले. एका मूळ बंगाली लोककथेवर आधारलेले हे नाटक असून, वर्षानुवर्षे चालत आलेली, एका पिढीने दुसऱ्या पिढीला सांगितलेली ही 'सुंदरबनाची' लोककथा जतन करून ठेवली आहे. ५० मिनिटांच्या या प्रयोगात विविध भागांतील लोकसंगीत व लोकवाद्ये वापरण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील तमाशा, बंगालमधील काही लोककला प्रकारांचा समावेश होता. बंगालमधील ही सर्वात जुनी लोककथा असून, या सादरीकरणामधून निसर्ग, माणूस, धर्म अशा कितीतरी गोष्टींचे दडलेले संदर्भ सापडले.
नाटकात रुचिका खोत, सतीश तांदळे, कल्पेश समेळ, जयदीप कोडोलीकर, सुशांत मधाळे, प्रदीप मोरे, मल्हार दंडगे व प्रतीक्षा खासणीस यांनी भूमिका केल्या. उत्तरार्धात थिएटर वर्कर्स मुंबई प्रस्तूत 'मिरासदारी-भुताचा जन्म' हा एकपात्री प्रयोग संकेत विश्वासराव या कलाकाराने सादर केला. या कथेमध्ये तुकाराम पैलवान आणि वाटसरू या दोन्ही व्यक्तिरेखा आपले अभिनय व आवाजाने जिवंत केल्या. गैरसमज, अंधश्रद्धा आणि अतिशयोक्ती यामधून एका ग्रामीण माळावर भुताचा जन्म कसा होतो, याचा विनोदी अनुभव या कथेमध्ये मांडला आहे.
संतोष आबाळे यांनी स्वागत समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले. रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात झालेल्या कार्यक्रमास वैशाली नायकवडे, विमलकुमार बंब यांच्यासह रसिक उपस्थित होते.
फोटो ओळी
१६०३२०२१-आयसीएच-०३
इचलकरंजीत मराठी भाषा दिवसानिमित्त येथे 'आलोर गान' हे नाटक टायनी टेल्सच्या कलाकारांनी सादर केले.