लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोविडनंतरच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोल्हापुरात नागाळा पार्क येथील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र येथे लोककथेवर आधारित ‘आलोर गान’ नाटकाचा प्रयोग रविवार, ३ आणि मंगळवार, ५ जानेवारी रोजी होत आहे. मर्यादित प्रेक्षकसंख्येसह टायनी टेल्स निर्मित, भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि सर्जनशाळा आयोजित हे नाटक दोन्ही दिवशी सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहे.
‘''संध्या राव’ यांनी लिखित स्वरूपातून जतन करून ठेवलेल्या मूळ बंगाली लोककथेवर हे ‘आलोर गान’ नाटक बेतलेले आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली, एका पिढीने दुसऱ्या पिढीला सांगितलेल्या ‘सुंदरबनाची’ लोककथेचे नाट्यरूपांतरण आणि दिग्दर्शन कोल्हापूरच्या प्रतीक्षा खासनीस यांनी केले आहे. या नाटकात महाराष्ट्रातील तमाशा तसेच बंगालमधील काही लोककलाप्रकारांचा समावेश आहे.
या नाटकाला ऋषिकेश देशमाने यांचे संगीत असून महेंद्र वाळूंज आणि शुभम कुंभार हे संगीत सहाय्यक आहेत. वेषभूषा प्राजक्ता कवळेकर यांची असून मधुरिका महामुनी वेषभूषा सहाय्यक आहेत तर मिताली गाठे यांची रंगभूषा आहे. या नाटकात ऋचिका खोत, सतीश तांदळे, कल्पेश समेळ, जयदीप कोडोलीकर, सुशांत मधाळे, प्रदीप मोरे, मल्हार दंडगे या कलाकारांच्या भूमिका असून नाटकासाठी हिमांशू स्मार्त, तेजस कुलकर्णी यांनी विशेष सहाय्य केले आहे.
नाट्यगृहाविना नाट्यप्रयोग, खुल्या रंगमंचावर सादरीकरण
नेहमी एका ठरावीक प्रकारच्या साच्यात, नाट्यगृहात नाटक पाहत असतो. पण हे नाटक मुळातच नाट्यगृहाला, नेहमीच्या नाट्यसंकल्पनेला काहीसे छेद देणारे आहे. या नाट्यप्रयोगासाठी खुला रंगमंच आणि आजूबाजूच्या जागेचाच वापर केलेला आहे. साधारणपणे ५० मिनिटांच्या या प्रयोगात विविध भागातले लोकसंगीत, लोकवाद्य वापरण्याचा प्रयत्न केला आहे.
(संदीप आडनाईक)