कागल
: ६ जून शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत झाले असून राज्यभरात शिवप्रेमी विविध उपक्रम राबवत आहेत. कोल्हापुरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. अल्पना चौगुले यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे जलरंगातील चित्र रेखाटले आहे. चौगुले यांनी हे चित्र शनिवारी मंत्री मुश्रीफ यांना भेट दिले. या वेळी सोपान चौगुले, शिवप्रेमी संभाजीराव चेंडके, भैया माने, नेताजी मोरे उपस्थित होते.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे उद्धारक आहेत. त्यांचे चरित्र आणि चारित्र्य यामुळेच खऱ्या अर्थाने जीवन परिपूर्ण होईल. लोकसेवेचा हा वस्तुपाठ कार्यकर्त्यांनी स्वीकारावा. डाॅ. अल्पना चौगुले यांनी रेखाटलेले चित्र प्रेरणादायी ठरेल. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर ६ जूनला गावोगावी व्हावा, ही आपली तळमळीची भावना आहे.
● कोट.
‘मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवस्वराज्य दिनाचा हा ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. तो सर्वच समाजासाठी प्रेरणादायी आहे. यामध्ये आपलेही थोडेफार योगदान व्हावे, या भावनेतूनच हे चित्र रेखाटले आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेशी , मायभगिनींशी संवाद साधत आहेत, असे भाव दर्शवले आहे. इतिहास संशोधक डाॅ. जयसिंगराव पवार व डाॅ. इंद्रजित सावंत यांनी प्रेरणा दिल्याने हे चित्र साकारले आहे.’
डाॅ. अल्पना चौगुले. ( चित्रकार )
चौकट. प्रत्येक ग्रामपंचायतीला चित्र.
मंत्री मुश्रीफ यांनी तातडीने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना फोन करून या चित्राच्या प्रति जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पाठविण्याच्या सूचना दिल्या
फोटो ओळी -
कागल - डाॅ. कल्पना चौगुले यांनी जलरंगात रेखाटलेले शिवस्वराज्य दिनाचे छायाचित्र मंत्री मुश्रीफ यांना आज प्रदान केले. या वेळी सोपान चौगुले, संभाजीराव चेंडके, भैया माने उपस्थित होते.
छायाचित्र- संदीप तारळे- गलगले.
२९ कागल अल्पना चौगुले