कोल्हापूर : कोरोनात वापरलेली केवळ पीपीई किट इतर ठिकाणी प्रक्रियासाठी पाठविण्यास परवानगी आहे. मात्र, महापालिकेकडून सर्वच कोरोनाचा कचरा खुल्या वाहनातून मुंबईकडे पाठविला जात आहे. यामागे महापालिकेचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी केला आहे.
या प्रकरणाची चौकशी करून कचऱ्यावर मलई खाणाऱ्या रॉकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणी मुंबई येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांच्याकडे ई मेलद्वारे केली आहे.महापालिकेकडून शहर व शहरालगत असणाऱ्या ८०० पेक्षा जास्त रुग्णालयांतील जैव वैद्यकीय कचरा संकलित करून लाईन बाजार येथील प्रकल्पाच्या ठिकाणी त्यावर प्रक्रिया केली जाते.
गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनामुळे जैव वैद्यकीय कचऱ्यात वाढ झाली आहे. यामध्ये कोविड कचरा जास्त आहे. क्षमतेपेक्षा जास्त कचरा प्रक्रियासाठी येत असल्याने परिसरात कचऱ्याचा ढीग पडला आहे.
महापालिकेकडून वाढीव कचरा मुंबई येथील वेस्ट मॅनेजमेंट (रॅमके) कडे दिला जात आहे. यामध्ये गैरप्रकार होत असल्याचा भांडाफोड प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी शुक्रवारी केला. त्यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन महापालिकेच्या वाहनातून जमा झालेला कोविड कचरा टेम्पोमध्ये टाकत असल्याचे दिसून आले. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारत हा कचरा कुठे जातो, असा सवाल केला. त्याला सविस्तर माहिती देता आली नाही.देसाई यांनी यासंदर्भात सांगितले की, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केवळ पीपीई किट मुंबईला पाठविण्याची महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिली आहे. तेही बंदिस्त कंटेनरमधून वाहतूक करायची आहे. मात्र, महापालिकेडून सर्वच कचरा पाठविला जात आहे.
असे असताना हँडग्लोव्हज, मास्क, इतर साहित्यही प्लास्टिकच्या पिशवीतून उघड्या टेम्पोतून पाठविला जात आहे, हे धोकादायक आहे. तसेच कर्मचारीविना पीपीई किटमध्ये संकलित कचऱ्याच्या पिशव्या टेम्पोत टाकत आहेत.
महापालिकेचा प्रकल्प पूर्ण क्षमेतेने सुरू नाही. यामुळेच कचऱ्यात वाढ झाली आहे. वापरलेल्या हँडग्लोव्हजचा पुन्हा वापर होत असल्याचे यापूर्वी समोर आले आहे. त्यामुळे हा कचरा नेमका कुठे जातो. त्याचे काय होते, महापालिकेच्या या सर्व प्रकियाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली असल्याचे देसाई यांनी सांगितले.महापालिकेच्या जैव वैद्यकीय प्रक्रिया प्रकल्पाची रोज १६०० किलो कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. यापूर्वी केवळ १ हजार किलो कचरा येत होता. कोरोनामुळे रोज ४५०० किलो कचरा जमा होत असून यापैकी केवळ ३५०० किलो कचरा कोविडचा आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या परवानगीनेच येथील जादाचा कचरा मुंबई येथील रॅमके कंपनीकडे पाठवत असल्याची माहिती महापालिकेच्या संबंधित विभाग प्रमुखाने दिली आहे.