भारत चव्हाण / कोल्हापूर : शहरात अमृत योजनेतून सुरू असलेल्या जलवाहिन्या, ड्रेनेजलाईन टाकण्यासह बारा जलकुंभ बांधण्याच्या कामाची ‘डेडलाईन’ संपली, तरी कामे पन्नास टक्के अपूर्णच राहिली आहेत. तांत्रिक अडचणी, ठेकेदाराचे दुर्लक्ष, कामावरील नियंत्रणाचा अभाव यामुळे कामे अपूर्ण असली, तरी ती पूर्ण झाली नाहीत, तर थेट पाईपलाईनचे पाणी दिवाळीपर्यंत कसे मिळणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.
काळम्मावाडी धरणातून शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची योजना आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यावर्षी दिवाळीचे पहिले स्नान दुधगंगा धरणातील पाण्यानेच होईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. त्यामुळे या योजनेबाबात शहरवासीयांत उत्सुकता लागून राहिली आहे.
थेट पाईपलाईन योजनेचे पाणी येईल, तेव्हा शहरातील वितरण व्यवस्था अधिक सक्षम करावी लागणार असल्यामुळे ही कामे अमृत योजनेतून हाती घेण्यात आली आहेत. शहरांतर्गत जलवाहिन्या टाकणे, जुन्या वाहिन्या बदलणे, विविध ठिकाणी १२ जलकुंभ उभारणे अशा कामांसाठी २०१७ मध्ये १७५ कोटींचा निधी मंजूर झाला. दास ऑफशॉवर कंपनीची ठेकेदार म्हणून नियुक्ती झाली. ड्रेनेजलाईनची कामे ३३ महिन्यांत, तर पाणी पुरवठ्याची कामे ३० महिन्यांत पूर्ण करायची होती. कामात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी व कोरोनाची साथ यामुळे ठेकेदारास सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. परंतु डेडलाईन संपली, तरी कामे पन्नास टक्केच झाली आहेत.
पॉईंटर -
-ही आहे कामाची गती -
- शहरात १२ जलकुंभांपैकी आठ जलकुंभांचे काम सुरू.
- आठही जलकुंभांचे काम २५ टक्केच पूर्ण.
- चार जलकुंभांच्या कामाला अद्याप सुरुवातच नाही.
- ३९६ किमीपैकी २४७ किमी जलवाहिनीचे काम पूर्ण.
- ११३ किमी पैकी ५९ किमी ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण.
- येथे बांधले जातायत जलकुंभ -
- कसबा बावडा, गोळीबार मैदान, शिवाजी पार्क, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, कदमवाडी, सम्राटनगर, पुईखडी, राजारामपुरी ९ वी गल्ली (अंशत: काम पूर्ण) -
- ताराबाई पार्क, सायबर चौक, आपटेनगर, बोंद्रेनगर. (अद्याप कामाला सुरुवात नाही)
‘डेडलाईन’संपली, कारवाई काय करणार?
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी २४ नोव्हेंबर २०२० रोजी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत केवळ तीस टक्केच काम पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी ठेकेदाराचे प्रतिनिधी, एमजेपीचे अधिकारी यांना धारेवर धरले होते. एवढेच नाही,तर दि. ३१ मार्चपर्यंत कामे पूर्ण करावीत अन्यथा कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला होता. डेडलाईन संपली तरी, कामे अपूर्णच असल्यामुळे आता प्रशासक बलकवडे काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.
- जागा संपादनाचे प्रस्ताव देणार - घाटगे
चार जलकुंभ हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेवर बांधायचे असून, त्यासाठी नगरविकास विभागामार्फत पाणी पुरवठा विभागाला प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितले. कामाला सुरुवात होऊनही तीन वर्षे प्रस्ताव का पाठविले गेले नाहीत, हेच कळत नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महापालिका अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाच त्यातून समोर आला आहे.