कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर काहींना ताप येतो, कणकण जाणवते, अंगदुखी सुरू होते. पण काहींना यातील कोणतीच लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे लसीकरणानंतर लक्षणे जाणवली किंवा नाही जाणवली, तरीही संबंधित व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती वाढत असते. लस प्रभावी ठरत असते. त्यामुळे विनाकारण शंका-कुशंका मनात बाळगण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या लसीकरणास वेग आला असून, सर्वत्र लस सहज उपलब्ध होत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. परंतु लसीकरणाबाबत काही शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. लसीकरणानंतर ताप न आल्यास लसीकरणाचा परिणाम होणार की नाही? यावर अनेकजण साशंक दिसत आहेत.
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर, बहुतांश नागरिकांना ताप आला, कणकण आली, अंगदुखी जाणवली. दुसरा डोस घेणाऱ्यांना त्याचा त्रास कमी प्रमाणात जाणवला. तर काहींना कसलीच लक्षणे दिसली नाहीत. तापही आला नाही आणि अंगदुखीही जाणवली नाही. त्यामुळे लस घेऊनही काहीच झाले नाही म्हटल्यावर लस खरी होती का? अशा नाहक प्रश्नांची निर्मिती झाली आहे.
- ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी? -
लसीकरणानंतर सगळ्यांनाच ताप, कणकणी, अंगदुखी सुरू होते असे नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर ते अवलंबून असते. त्रास झाला नाही म्हणून शंका घेण्याचेही कारण नाही. शरीरातील विषाणू जर मृत असतील तर लसीकरणानंतर त्रास होतो. जर काही प्रमाणात विषाणू जिवंत असतील तर लसीकरणानंतर फारसा त्रास होत नाही. म्हणजे ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली आहे, त्यांना त्रास कमी होतो. त्रास झाला किंवा नाही झाला तरी लस ही शरीरावर चांगला परिणाम घडविते, असे वैद्यकीय शास्त्र सांगते.
- आतापर्यंत झालेले लसीकरण -
- उद्दिष्ट - ३१ लाख ९६ हजार ५४०
- पहिला डोस - १८ लाख ०८ हजार ६५२
- दोन्ही डोस - ०८ लाख १३ हजार ४७९
- कोविशिल्ड - १६ लाख ९६ हजार ५४० (पहिला डोस)
-कोविशिल्ड - ०७ लाख ४९ हजार १०८ (दुसरा डोस)
- कोव्हॅक्सिन - ०१ लाख ०९ हजार ०९६ (पहिला डोस)
- कोव्हॅक्सिन - ६१ हजार ७७० (दुसरा डोस)
- स्पुटनिक - ३०१६ (पहिला डोस), २६०१ (दुसरा डोस)
- कोविशिल्डचा त्रास अधिक -
कोविशिल्ड डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने त्रास होणाऱ्यामध्ये कोविशिल्ड लस घेतलेल्यांचीच संख्या अधिक आहे. कोविशिल्डचा पहिला डोस घेणाऱ्यांना लसीकरणानंतर एकदोन दिवस त्रास जाणवला. तुलनेने कोवॅक्सिन डोस घेतलेल्यांना त्रास कमी जाणवला.
कोट १.
पहिला डोस घेतला तेव्हा विश्रांती घेता आली नाही, त्यामुळे थोडी अंगदुखी जाणवली. पण ताप आला नाही. दुसरा डोस घेतला तेव्हा तर काहीच त्रास झाला नाही.
सुभाष माने. सेवानिवृत्त
कोट २.
लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर ताप, कणकण असं काही जाणवलं नाही, परंतु एक दिवस अंग मोडून आल्यासारखे झालं होतं. नेहमीप्रमाणे दिनक्रम सुरू होता.
विद्याधर कुलकर्णी, व्यावसायिक
-सरकारी अधिकाऱ्यांचा कोट -
लसीकरणानंतर त्रास झाला तरच लस परिणामकारक आहे असे अजिबात नाही. त्रास झाला काय किंवा नाही झाला काय, लस आपले काम करत असते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील रोग प्रतिकारकशक्तीवर हे अवलंबून असते.
डॉ. फारूक देसाई,
लसीकरण नियंत्रण अधिकारी