कोल्हापूर , दि. १९ : मांगल्याचे प्रतीक असलेल्या, लक्ष-लक्ष दिव्यांनी सारा आसमंत उजळणाऱ्या आणि जीवनात उत्साह, आनंद घेऊन येणाऱ्या दिवाळीत गुरुवारी शहरातील घराघरांत आणि दुकानांतून भक्तिमय वातावरणात विधीवत लक्ष्मी-कुबेर पूजन सोहळा साजरा झाला. त्यानंतर झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला.
अश्विन अमावस्येच्या दिवशी प्रदोषकाळी लक्ष्मीचा होणारा संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते, असे मानतो. त्यानुसार दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या लक्ष्मीपूजनानिमित्त संचार करणाऱ्या या लक्ष्मीचे मनोभावे स्वागत कार्यात घरा-घरांतील सुवासिनी महिला दुपारी तीन वाजल्यापासून व्यस्त होत्या.
स्वागतासाठी त्यांनी आपल्या दारात मोठे-मोठ्या विविधरंगी रांगोळ्याही काढल्या. सायंकाळी सहाच्या सुमारास मात्र घरा-घरांत लक्ष्मीच्या प्रतिमेच्या पूजनाची धांदल उडाली. कर्त्या व्यक्तींबरोबरच सर्वांनीच या पूजेत स्वत:ला झोकून दिले. पैशांच्या ताटांत दागिने अर्पण केलेल्या लक्ष्मी व कुबेराच्या प्रतिमेची पूजा करून नंतर लाह्या, भेंड-बत्तासे, विविध प्रकारची फळे, केळी आणि फराळातील गोडधोड पदार्थ आदींचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्याचबरोबर घर व अंगणाची स्वच्छता करणाऱ्या झाडूंचेही लक्ष्मीसोबत पूजन करण्यात आले.
लक्ष्मीचा आरती सोहळा झाल्यानंतर मात्र गल्लो-गल्ली फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी झाली. घरातील लहानांपासून ते अगदी ज्येष्ठ मंडळींनीही फटाके उडविण्याचा आनंद लुटला. रात्री उशिरापर्यंत सुरूच राहिलेल्या या आतषबाजीमुळे आसमंत उजळून निघाला. उशिरापर्यंत सुरूच राहिलेल्या आतषबाजीमुळे तेजाळून निघालेल्या शहरातील गल्लो-गल्ल्यांमध्ये एका वेगळ्याच उत्साहाची नांदी झाली.
कार्यालये, व्यावसायिक, दुकानदारांनीदेखील सायंकाळी व रात्री लक्ष्मीपूजन केले. सोने-चांदीचा व्यवसाय करणाऱ्या सराफांच्या पेढीवर अधिक धार्मिक विधींनी ही पूजा करण्यात आली. झेंडूच्या फुलांच्या माळा, विद्युत माळा, पणत्या लावून दुकानांना सजविण्यात आले होते. काही दुकानांमध्ये एका बाजूला लक्ष्मीपूजन आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकांना सेवा असे चित्र होते. दुकानांमध्ये वर्षातून एकदा होणाऱ्या या खास पूजनाला सर्व कुटुंबीयांनी उपस्थिती लावली होती.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तूचे आगमनवर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या दिवाळी पाडव्याला प्रत्येक कुटुंबात एका तरी नवीन वस्तूचे आगमन होते. या दिवशी वास्तू, विविध वस्तूंची खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. त्यांची नोंदणी करण्यासह त्या पाडव्याच्या मुहूर्तावर ताब्यात घेण्यासाठी वाहनांची शोरूम्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचरसारख्या शोरूममध्ये आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची अनेकांची धावपळ सुरू होती.