कोल्हापूर : राज्य शासनातर्फे परवानाधारक रिक्षाचालकांकरिता मंजूर झालेले अनुदान परवानाधारक रिक्षाचालकांना मिळणार आहे. रिक्षा व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरीब जनतेचे दु:ख जाणून केलेल्या मदतीबाबत मी आभारी आहे, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. शनिवार पेठेतील शिवसेना शहर कार्यालयात रिक्षाचालकांच्या ऑनलाइन नोंदणी शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
क्षीरसागर म्हणाले, राज्यात ७ लाख २० हजार रिक्षाचालकांची संख्या आहे. कोरोनामुळे त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात हातावरचे पोट असणाऱ्या रिक्षाचालकांना राज्य शासनाने मदत केली आहे. रिक्षा व्यावसायिकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन व्हावे, अशी मागणी मी राज्य शासनाकडे वारंवार केली आहे. त्यानुसार न्याय मिळाला आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि रिक्षा व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यानुसार तीन हजार रिक्षाचालकांना रिक्षा ई-मीटर मोफत वाटप केली आहे. सद्यस्थितीत रिक्षाचालकांनी ऑनलाइन नोंदणीकरिता शिवसेना शहर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
फोटो-०९०६२०२१-कोल-राजेश क्षीरसागर)