कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात माजी आमदार अमल महाडिक यांना विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मुंबईत काल, सोमवारी झालेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अमल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले.
गेले पंधरा दिवस सतेज पाटील यांच्याविरोधात कोण असा प्रश्न उपस्थित होत होता. शौमिका महाडिक किंवा राहूल आवाडे यांच्यापैकी एक नाव निश्चित होईल अशी चर्चा होती. परंतू पक्षाने अमल महाडिक यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीला केंद्रीय मंत्री पियुष गोयल, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. हे नाव प्रदेश पातळीवरून केंद्रीय पातळीवर पाठवण्यात आले आहे. तेथून अमल यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.
अमल महाडिक यांनी २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालिन गृहराज्यमंत्री असलेल्या पाटील यांचा पराभव केला होता. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांचे पुतणे ऋतुराज यांनी अमल यांना दक्षिण करवीर मतदारसंघातून पराभूत केले होते. त्याआधी गेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव केला होता. आता पुन्हा पाटील आणि महाडिक यांच्यात हा सामना रंगणार असून या लढतीकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.