कोल्हापूर : भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी आमदार अमल महाडिक यांनी रविवारी एक हजार वाहनांच्या सहभागाने रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. सकाळी अकरा वाजता शिरोली येथून सुरू झालेल्या रॅलीत चारशेहून अधिक चारचाकी, तर सहाशेहून अधिक दुचाकी सहभागी झाल्या. महाडिकांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे शहरात चर्चेला उधाण आले. राज्य कार्यकारिणीसाठी कार्यकर्त्यांना एकत्रित नेले, यामध्ये शक्तिप्रदर्शनाचा विषय नाही, अशी प्रतिक्रिया आमदार महाडिक यांनी याबाबत दिली.भाजपचे राज्य कार्यकारिणीचे अधिवेशन गेली तीन दिवस पेटाळा मैदानावर सुरू आहे. अधिवेशनासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील दिग्गजांनी हजेरी लावली. राज्यभरातून अधिवेशनासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अमल महाडिक यांच्या घरी शनिवारी सकाळी नाष्ट्याचे आमंत्रण स्वीकारले होते. रविवारी महाडिक यांनी हजारहून कार्यकर्त्यांच्या सहभागाने रॅली काढून भाजपमधील उपस्थिती ठळक केली. यामध्ये ५१२ चारचाकी तर चारशे दुचाकी वाहनांचा समावेश होता.सकाळी अकराच्या सुमारास शिरोली येथील महाडिक यांच्या कार्यालयातून रॅलीने आलेल्या कार्यकर्त्यांनी शहरात प्रवेश केला. भाजपचे झेंडे तसेच भाजप नेत्यांसह अमल महाडिक यांचे फलक कार्यकर्त्यांच्या हातात होते. भाजप अधिवेशनामुळे शहर भाजपमय झाले आहे. त्यातच महाडिक यांच्या रॅलीमुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शहरात पुन्हा भाजपमय वातावरण निर्माण झाले. (प्रतिनिधी)
अमल महाडिकांचे शक्तिप्रदर्शन
By admin | Published: May 25, 2015 12:23 AM