कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ ही अनिवार्य असून, शासनाने त्याची अधिसूचना ३१ आॅगस्टपूर्वी काढावी, या मागणीसाठी ३५ सर्वपक्षीय कार्यकर्ते व महिला हे गुरुवारी (दि. २५ आॅगस्ट)पासून महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषणास बसणार असल्याचे हद्दवाढ सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने गुरुवारी बैठकीत जाहीर केले. या बैठकीत कार्यकर्त्यांनी ‘अभी नहीं तो कभी नहीं’चा नारा दिला. आंदोलनाची तीव्रता वाढविण्याची तसेच सर्व शहरवासीयांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. मुदतीपूर्वी शासनाने हद्दवाढीची अधिसूचना न काढल्यास उपोषणात सहभागी होणार असल्याची घोषणा महापौर अश्विनी रामाणे यांनी यावेळी केली.शहराच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वमान्य तोडगा काढतील, असे यापूर्वीच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत येत्या दोन दिवसांत बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तत्पूर्वी हद्दवाढ समर्थक आणि विरोधक या दोन्हीही बाजूंनी आंदोलनाची धार तीव्र करत शासनावर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हद्दवाढ सर्वपक्षीय कृती समितीने आमरण उपोषणाच्या तयारीसाठी गुरुवारी येथील महाराणा प्रताप चौकात कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांच्या कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.अधिसूचना जाहीर होईपर्यंत विविध प्रकारे आंदोलने व जनजागृती करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ३१ आॅगस्टपूर्वी हद्दवाढीची सूचना न निघाल्यास पुन्हा दोन वर्षे हद्दवाढीच्या प्रक्रियेसाठी वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी शहरवासीयांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आर. के. पोवार यांनी केले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महिला बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, भाजपचे सुरेश जरग, अॅड. पंडितराव सडोलीकर, किशोर घाटगे, नामदेवराव गावडे, फिरोज खान उस्ताद, बाबूराव कदम, रेखा आवळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....तर दहापट शक्तिप्रदर्शन करूहद्दवाढीसाठी जितके कार्यकर्ते उपोषणाला बसतील त्याच्या दुप्पट ग्रामीणचे कार्यकर्ते उपोषण करतील, असा इशारा दोन दिवसांपूर्वी हद्दवाढीला विरोध करणाऱ्या आंदोलनात करण्यात आला. त्याचाही समाचार भाजपचे महेश जाधव यांनी घेतला, ते म्हणाले दुप्पट नव्हे तर दहापट उपोषणाला बसून शक्तिप्रदर्शन करू. हद्दवाढीबाबत शासनाच्या हातात अधिसूचना तयारच आहे, लवकरच मुख्यमंत्री ती जाहीर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.शेट्टींचा विरोध दुर्दैवीटोलबाबत नेते टाहो फोडत आहेत; पण शहराचा टोल केव्हाच माफ झाला असता पण ग्रामीण जनतेला टोल नको म्हणून शेवटपर्यंत टोकाचे आंदोलन शहरवासीयांच्या सहभागाने झाले. खासदार राजू शेट्टी हे जिल्ह्याचे नेते असताना त्यांनी हद्दवाढीला विरोध करणे दुर्दैवी आहे. त्यांनी विरोधाची भूमिका सोडावी, असेही आवाहन बाबा पार्टे यांनी केले.नेत्यांनाच विचाराशहराची गटारगंगा केल्याचा आरोप नेत्यांकडून होत असल्याने महापालिकेचे नेतृत्व सातत्याने ग्रामीण नेतेच करीत आहेत. त्यामुळे शहराचा विकास केला की गटारगंगा याचा जाब तुम्ही नेत्यांनाच विचारा, असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर म्हणाले. जमिनीवरील आरक्षणे व धोरण हे विधिमंडळात ठरते, कायदे करणाऱ्या सभागृहाचे नेतृत्व करणारेच स्वत:च्या स्वार्थासाठी आक्षेप घेत असल्याबाबत त्यांनी खंतही व्यक्त केली.
हद्दवाढसाठी गुरुवारपासून आमरण उपोषण
By admin | Published: August 19, 2016 1:01 AM