कोल्हापूर : पतीच्या मृत्यूनंतर अवयवदान करून चौघांचे प्राण वाचविण्यात पुढाकार घेणाऱ्या शीतल अमर पाटील (रा. निगवे खालसा, ता. करवीर) यांना नोकरीचा आधार देण्याची गरज आहे. सध्या समाजातून त्यांना आर्थिक मदतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातून चार पैसे उभा राहतीलही; परंतु त्या कुटुंबाच्या भवितव्याचा विचार करता, दिवंगत अमर यांच्या पत्नीस दूध संघ, साखर कारखाना किंवा एखाद्या शिक्षण संस्थेत नोकरी मिळाल्यास कुटुंबाची घडी बसू शकते.
दिवंगत अमर पाटील यांच्या कुटुंबियांना आमदार अमल महाडिक यांनी बुधवारीच (दि. ९) रोख मदत दिली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनीही या कुटुंबाला मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २५ लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दोन दिवसांत गावी जाऊन पाटील कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यास मुख्यमंत्री निधीतूनही काही लाख रुपये रोख रक्कम मिळू शकेल; परंतु तेवढ्याने या कुटुंबाचा प्रश्न कायमचा सुटणार नाही. अमर यांच्या पत्नी शीतल या बारावीपर्यंत शिकल्या आहेत. दोन मुलांंच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांना आधार दिल्यास हिमतीने त्या उभ्या राहू शकतील.
राजर्षी शाहू महाराजांची भूमिका साकारणारा नाट्य कलावंत सागर चौगुले याचे गेल्या वर्षी पुण्यात राज्य नाट्य स्पर्धेत ‘अग्निदिव्य’ नाटक साकारताना हृदयविकाराच्या धक्क्याने रंगमंचावरच निधन झाले. त्या कुटुंबांलाही पालकमंत्री पाटील यांनीच पुढाकार घेऊन मदतीचा आधार दिला. सागर यांच्या पत्नीस पालकमंत्र्यांनी शब्द टाकल्यावर पुणे जनता बँकेने कायमची नोकरी दिली. तसे एखादा शब्द मंत्री पाटील यांनी जिल्हा दूध संघ, साखर कारखाना, जिल्हा बँक अथवा एखाद्या चांगल्या शिक्षण संस्थेकडे टाकल्यास त्यांना कुणीही नोकरीवर घेऊ शकेल.
या संकटातून आता बाहेर येऊन पुढे जाणे हे अजून उभे आयुष्य पुढ्यात पडलेल्या शीतल व दोन मुलांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे मदत करताना ज्यांना ती आर्थिक स्वरूपात करायची आहे ती करावीच; परंतु कायमस्वरूपी आधार महत्त्वाचा आहे. दुसºयासाठी जगून ‘अमर’ झालेल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात कोल्हापूरचा माणूस कधीच मागे राहणार नाही.यांचे प्रयत्न मोलाचे मृत्यूनंतर नेत्रदान करायचे झाल्यासही अनेकजण तयार होत नाहीत परंतू शीतल पाटील या तर पतीचे अवयवदान करण्यास तयार झाल्या. त्यांची त्यासाठी मनोभूमिका तयार करण्यात दीर सचिन, भावस भाऊ जितेंद्र पवार, सई पवार,अमर पारळे व मामा संपत कळके यांचे प्रयत्न मोलाचे ठरले.