- विश्वास पाटील, कोल्हापूर
कोल्हापूरची कन्या ‘अॅमेझॉन’सारख्या जगातील बलाढ्य कंपनीत अधिकारी म्हणून काम करीत असेल आणि त्यांच्या कामाचा त्या कंपनीलाही उत्तम उपयोग होत असेल तर...! होय... तसेच आहे. या कन्येचे नाव आहे, अस्मिता मंदार शिंदे. खरे तर त्या इतरांनाही आदर्श ठरू शकतील अशाच, ‘अॅमेझिंग अस्मिता...!’ अयोध्या डेव्हलपर्सचे मालक व्ही. बी. पाटील यांच्या त्या कन्या. त्यांचे शिक्षण होली क्रॉस स्कूल व केआयटी कॉलेजमध्ये झाले. त्यांनी जीवनात वेगळ्या वाटा शोधण्यास प्राधान्य दिले. व्ही. बी. पाटील म्हणजे करवीर तालुक्यातील शिंगणापूरचे खानदानी मराठा कुटुंब. त्यामुळे त्यांनी कोणतेही करिअर केले नसते तरीही एखादे श्रीमंत कुटुंब त्यांना सासर म्हणून मिळाले असते; परंतु अस्मिता यांनी सुरुवातीपासूनच अशा पारंपरिक, खानदानी स्त्रीच्या चौकटीतील जगण्यापेक्षा स्वकष्टाने विश्व निर्माण करण्यावर भर दिला.
आईवडिलांनीही त्यांच्यावर तसे संस्कार केले. आमचा सपोर्ट नक्कीच राहील; परंतु तुम्ही स्वत: आयुष्य घडवून दाखवा, असा पालकांचा आग्रह. या अपेक्षेच्या कसोटीवर त्या खऱ्या उतरल्या. ‘ही व्ही. बी. यांची कन्या’ या ओळखीच्या पलीकडे जाऊन त्यांनी गुणवत्तेवर स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडविले. कोणत्याही आईवडिलांना यापेक्षा दुसरे काय हवे असते? मुलीने नाव उज्ज्वल केले असा अभिमान बाळगावा, एवढे चांगले करिअर अस्मिता यांचे आहे. त्या अमेरिकेतील सिएटल शहरात अॅमेझॉन कंपनीत डाटा असोसिएट्स म्हणून काम करतात. सध्या त्या प्रसूतीच्या रजेवर आहेत. त्यांचे पती मंदार हे सॉफ्टवेअर कंपनीत उच्च पदावर काम करतात.
अॅमेझॉनसारख्या ब्रॅँडमध्ये संधी मिळताना तिथे किती स्पर्धाही असेल, याचा विचार केलेला बरा; परंतु त्यांना अॅनॅलिस्ट म्हणून केलेल्या कामाचा अनुभव कामी आला. ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांच्यासोबत त्यांनी विविध प्रकल्पांवर केलेले काम त्यांच्या अनुभवाची उंची वाढवून गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी व्यवस्थापनशास्त्रातील ‘एम. एस.’ ही पदवी घेतली. या पदवीने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला जगाचा कॅनव्हॉस लाभला. तुमची कष्ट करण्याची तयारी असेल, तर जगात खूप संधी आहेत, हे इंग्लंडने त्यांच्या मनावर बिंबविले.
‘अॅमेझॉन’ने अमेरिका व इंग्लंडमध्ये नुकत्याच लाँच व यशस्वी केलेल्या ‘हब’ या प्रकल्पावर त्यांनी काम केले आहे. जिथे अॅमेझॉनचा डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला घरी गेला आणि घरी कुणीच नसेल तर काय करणार, या प्रश्नावरील उत्तर शोधणारा हा प्रकल्प आहे. त्यासाठी आॅटोमॅटिक व्यवस्था उभी करण्यात आली आहे. सिक्युरिटी कोड दिला की दार उघडेल व तिथे ही वस्तू ठेवली जाईल. ज्यांनी ती खरेदी केली आहे, ते केव्हा घरी येतील तेव्हा ती त्यांना सुरक्षित मिळेल, असा प्रकल्प आहे.
‘अॅमेझॉन’मध्ये विविध मार्गांनी येणाºया डाटाचे सामाजिक-आर्थिक अंगांनी विश्लेषण करण्याच्या टीममध्ये त्या काम करतात. लोकांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांच्या बदलत्या इच्छा-आकांक्षा, त्यांची गरज काय आहे, यावर सातत्याने संशोधन सुरू असते. अॅमेझॉनची पॉलिसीच अशी आहे की, सुरुवातीला सहज म्हणून लोक या पर्यायाचा स्वीकार करतात आणि मग त्यांच्या जगण्याला ‘अॅमेझॉन’वरील खरेदीची सवयच बनून जाते. सकाळी आठ ते सायंकाळी पाच अशी वेळ त्या नोकरीसाठी देतात; परंतु तिथे त्यांना प्रत्येक मिनिटाचा हिशेब असतो. प्रचंड स्पीड व तितकाच तणाव असलेल्या क्षेत्राचे आव्हान त्यांनी समर्थपणे पेलले आहे.एखाद्या कॉर्पोरेट कंपनीत चांगल्या पॅकेजची नोकरी करून यशस्वी होण्यात मजा आहेच; परंतु आपले जगणे तेवढ्यापुरतेच मर्यादित राहू नये, असे त्यांना वाटते. त्यामुळे यापुढील काळात अकॅडेमिक रिसर्चसाठी काही वर्षे द्यावीत, असा विचार त्या करीत आहेत. कोणत्या विषयांवर अजूनही संशोधन होण्याची गरज आहे, याचा शोध घेण्यासाठी त्या आता लायब्ररीत जाऊन पुस्तकांचा धांडोळा घेत आहेत. त्यांना तशी मानसशास्त्रीय अभ्यासाची ओढ आहे. आपण एखादे असे संशोधन करावे की, त्यातून माणसाच्या जीवनातील विकासाचे पुढील दरवाजे उघडले जावेत, असा अस्मिता यांचा प्रयत्न आहे.
मी संगणक शिक्षण घेतले; परंतु आयुष्यभर नुसते संगणकाशीच बोलणे मला आवडले नाही. लोकांच्या भावभावनांचा अभ्यास करायचा म्हणून मी ‘अॅमेझॉन’मधील नोकरीस प्राधान्य दिले. मी आता अमेरिकेत असले तरी मला भारतात काम करण्याची इच्छा आहे.- अस्मिता मंदार शिंदे